नागठाणे परिसरात पिके काढण्यात बळीराजा व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:35+5:302021-02-16T04:40:35+5:30
नागठाणे : परिसरात सध्याच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी सुरू असल्यामुळे परिसरातील बळीराजा यामध्ये पूर्णतः व्यस्त असल्याचे चित्र ...
नागठाणे : परिसरात सध्याच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी सुरू असल्यामुळे परिसरातील बळीराजा यामध्ये पूर्णतः व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
नागठाणे परिसरातील संपूर्ण काशीळ, निसराळे, खोडद, अतीत, माजगाव, नागठाणे, पाडळी, निनाम, सोनापूर, मांडवे, बोरगाव, भरतगाववाडी, भरतगाव तसेच वळसे आदी गावांमध्ये मागील तीन महिन्यांच्या अंतरावर पेरणी केलेल्या ज्वारी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ झाली असून, पीक काढणीची वेळ आल्यामुळे भागातील बळीराजा पीक काढल्यानंतर पीक मळणीच्या कामात जवळपास महिनाभर व्यस्त राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागठाणे परिसरातील काही गावांमध्ये डुकरांकडून शिवारातील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी भागातील बळीराजा रात्रीच्यावेळी शिवारामध्ये पीक राखणीचे काम करत होता.
सध्या पीक काढणीसाठी आले असल्याने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. दिवसभर पीक काढून रात्री पुन्हा पिकाच्या राखणीसाठी बळीराजास शिवारात तळ ठोकून थांबावे लागत आहे. सध्याच्या दिवसात बळीराजाने पिकाची चांगली मशागत केल्यामुळे ज्वारी पिकास मोठमोठी कणसे आल्याचे दिसत आहे. मळणी झाल्यानंतर बळीराजास जोंधळा पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त होण्याची संधी चालून आली आहे. तसेच पीक काढणी आणि मळणी झाल्यानंतर बळीराजाच्या पाळीव जनावरांना पिकातून शिल्लक राहणाऱ्या कडब्याचाही चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे नागठाणे भागातील बळीराजा आनंदी असल्याचे दिसत आहे.