कास परिसरात पावसाळ्यापूर्वीच्या कामात बळीराजा व्यस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:48+5:302021-05-30T04:29:48+5:30

पेट्री : कास परिसरातील दुर्गम-डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेताच्या बांधावर पारंपरिक पद्धतीने ताली, घरे बांधणे, शेतीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त ...

Baliraja busy in pre-monsoon work in Kas area! | कास परिसरात पावसाळ्यापूर्वीच्या कामात बळीराजा व्यस्त !

कास परिसरात पावसाळ्यापूर्वीच्या कामात बळीराजा व्यस्त !

googlenewsNext

पेट्री : कास परिसरातील दुर्गम-डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेताच्या बांधावर पारंपरिक पद्धतीने ताली, घरे बांधणे, शेतीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग येऊन अनेकविध कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवसभर कुटुंबासह अपार मेहनत घेत आहेत.

कास पठार परिसर व अतिदुर्गम-डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी होते. मुख्यतः येथील शेती पावसावर अवलंबून असल्याने भात, नाचणी, वरी ही पिके शेेतकरी घेतात. निसर्गाचे बदलते ऋतूचक्र, हातातोंडाशी आलेल्या पिकांची वन्य पशु-पक्ष्यांकडून हाेणारी नासधूस यामुळे शेतीचे प्रमाण कमी आहे. बहुतांशी ग्रामस्थ उदरनिर्वाहासाठी तसेच रोजगारासाठी पुणे, मुंबई शहरांचा मार्ग धरतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनपूर्वीच अनेक चाकरमानी कुटुंबासमवेत आपापल्या गावात दाखल झाले आहेत. येथील शेतकरी शेतीबरोबरच जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. शेतपिकांच्या संरक्षणासाठी शेताच्या बांधावर बहुतांशजण सवडीनुसार मातीत ताली धरणे तसेच दगड-लाल मातीत घरे बांधतानाचे चित्र सध्या दिसत आहे.

पावसाळा सुरू होण्याअगोदर शेतकरी शेताच्या बांधावर ताली रचणे, नवीन वावरं पाडण्यासाठी आसपास उपलब्ध असणाऱ्या दगडी फोडणे, डोंगर उतारावर टप्प्याटप्प्याने शेती केली जात असल्याने मोठ्या प्रवाहात वाहून आलेल्या पावसाळ्यातील पाण्याने ताली पडल्या जातात. या ताली जुन्या दगडांचाच वापर करून दुरुस्त केल्या जात आहेत. वावरात आतून मातीची भर, दगडावर दगड व्यवस्थित रचून मातीतच पारंपरिक पद्धतीने ताली तसेच घरेदेखील बांधली जात आहेत.

(चौकट)...

तरव्याच्या भाजण्या, नांगरणीची कामे पूर्ण केली असून, भातखाचरांची डागडुजी व मशागती, नाचणी शेतीच्या मशागती, वावरात ताली धरणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, नवीन वावरं पाडणे, वावरातील काट्याकुट्यांची अडगळ बाजूला करणे, पडक्या नादुरुस्त भिंती दुरुस्त करणे, घराची झाडलोट, ढापावरील कचरा काढून कपड्यावरून बांधणी, झडपी बांधणे, घर शाकारणे, लाकडं-शेणकुट-गवत भरणे, ताली बांधणे, गवताच्या राख्या राखून कुंपण करणे, नवीन गोठा तयार करणे, झरा सुरक्षित ठेवणे आदी अनेकविध शेतीकामात शेतकरी व्यस्त आहेत.

(कोट)

डोंगरमाथ्यावरील भागात अतिपर्जन्यवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. याकामी चाकरमान्यांचीही मदत होत आहे.

- सुनील आखाडे, कुसुंबीमुरा (ता. जावळी)

२९ कास

कास परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला आहे. ( छाया : सागर चव्हाण )

Web Title: Baliraja busy in pre-monsoon work in Kas area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.