जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत बामणोलीतील जवान शहीद, जावळी तालुक्यावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:30 PM2022-05-21T12:30:04+5:302022-05-21T12:51:25+5:30
अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.
कुडाळ : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय २२) हे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टर भागात सेवा बजावत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. उद्या, रविवार त्यांचे पार्थिव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जवान प्रथमेश यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते. प्रथमेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरेवाडी, उच्च प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणोली तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल बामणोली येथे झाले.
पहिलेच पोस्टिंग जम्मूत
प्राथमिक शिक्षण घेत असताना देशसेवेची आवड त्यांना होती. धाडसी आणि करारी असलेले प्रथमेश आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करणारे आणि परिस्थितीची जाणीव असणारे होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते.
कुटुंबांचा एकमेव आधार
शहीद प्रथमेश हे कुटुंबांचा एकमेव आधार होते. यामुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़. सैन्य दलात दाखल झालेले प्रथमेश अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील संजय महादेव पवार, आई राजश्री,, लहान भाऊ आदित्य असा परिवार आहे.