बामणोली परिसरात भात रोपांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:52+5:302021-06-25T04:27:52+5:30
बामणोली : जावळी तालुक्यातील बामणोली परिसरात सततच्या पावसामुळे भात रोपांची वाढ खुंटली आहे. तसेच रोपे पिवळी पडल्याने उत्पादनात घट ...
बामणोली : जावळी तालुक्यातील बामणोली परिसरात सततच्या पावसामुळे भात रोपांची वाढ खुंटली आहे. तसेच रोपे पिवळी पडल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काससह बामणोली, तापोळा परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात पालापाचोळा जाळून भात तरवे बनवतात. मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी या भात रोपांचे तरवे पेरतात. यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर ३ व ४ जून रोजी भात रोपांसाठी पेरणी केली. रोपांची उगवण झाली. परंतू त्यानंतर संततधार पावसामुळे रोपांची वाढ खुंटली. शिवाय १६ जून रोजी रात्रभर सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक शेतकऱ्यांचे भात खाचरांचे बांध फुटले. ओढ्याकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भात खाचरात पाणी शिरले. भात रोपे गाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
भात तरव्यानंतर २१ ते २८ दिवसानंतर भात लावणी केली जाते. परंतु यावर्षी संततधार पाऊस कोसळत होता. परिणामी या पावसाने भात रोपांची वाढ खुंटली आहे. शिवाय भात रोपे पिवळी पडली आहेत. त्यामुळे भात लावणी १ जुलैनंतरच सुरू होणार आहे. शिवाय उत्पादनात घट होणार आहे. कारण भात रोपे चांगली असली तरच पीक चांगले येते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
फोटो दि.२४बामणोली फार्म नावाने...
फोटो ओळ : बामणोली परिसरात भात रोपे उगवून आली असलीतरी जोरदार पावसामुळे वाढ खुंटली आहे.
.............................................................