सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

By नितीन काळेल | Published: July 9, 2024 05:41 PM2024-07-09T17:41:57+5:302024-07-09T17:43:02+5:30

'पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी'

Ban entry of tourists to waterfalls, dangerous places in Satara district; Guardian Minister Shambhuraj Desai Instruction | सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

सातारा जिल्ह्यात धबधबे, धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा; पालकमंत्र्यांची सूचना 

सातारा : जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे, जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतींनी प्रवेश बंदीचे फलक लावावेत. सडावाघापूरसह इतर ठिकाणीही पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीतील उपायोजनांबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी पावसाच्या काळात आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास यंत्रणांनी सुरक्षित निवारे, पुरेसे अन्नधान्य, औषधसाठा याची तजबीज ठेवावी, अशी सूचना केली, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा सातारा जिल्ह्याचा पॅटर्न अनेक जिल्ह्यांनी स्वीकारला आहे. या योजनेचे काम गतीने होण्यासाठी सर्व प्रांताधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. शासनाने जारी केलेले अर्ज भरून घेण्यात यावेत, असेही स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डुडी यांनी पावसामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. औषध व धान्याचा पुरेसा पुरवठा झालेला आहे. अतिवृष्टीमुळे स्थलांतराची वेळ आल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले, तसेच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन दररोज घेत आहेत. येत्या २१ दिवसांत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Web Title: Ban entry of tourists to waterfalls, dangerous places in Satara district; Guardian Minister Shambhuraj Desai Instruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.