उसाच्या पट्ट्यात केळीची शेती जोमदार !

By Admin | Published: November 30, 2015 09:26 PM2015-11-30T21:26:15+5:302015-12-01T00:23:27+5:30

कऱ्हाड तालुक्यातील स्थिती : एकरी चाळीस टनांपर्यंत उत्पादन; दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी

Banana farming in sugarcane cultivation vigorous! | उसाच्या पट्ट्यात केळीची शेती जोमदार !

उसाच्या पट्ट्यात केळीची शेती जोमदार !

googlenewsNext

‘कृष्णा-कोयना नदीकाठावरील शेतकरी उसाबरोबरच इतर पिकांकडेही वळत आहेत. तीन वर्षांत उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्याला अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नगदी पीक म्हणून घेतलेल्या या पिकातून शेतकऱ्यांना एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळत आहे. कऱ्हाड तालुक्यात कृष्णा-कोयनाच्या दुतर्फा सुपीक शेतीचा पट्टा आहे. येथील शेतकरी अनेक वर्षांपासून ऊस व भात शेती करण्याला प्राधान्य देत होते. गेल्या काही वर्षांपासून ऊसदरात सातत्याने घसरण झाली. याचा परिणाम म्हणून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी इतर पिके पिकविण्यास प्रारंभ केला. कऱ्हाड-मलकापूर शहरापासून जवळ असलेल्या कापील, गोळेश्वर, नांदलापूर, जखिणवाडी, वारुंजी, चचेगाव, कार्वे, गोवारे या गावांमधून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकविण्याला पसंती दिली. तर काही शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उसाऐवजी केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या परिसरात मोजकेच शेतकरी केळीचे उत्पादन घेत होते. मात्र, काही वर्षांपासून जखिणवाडी, चचेगाव, विंग, येरवळे, काले या परिसरातील शेतकऱ्यांनीही केळीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस पट्ट्यातही केळीच्या बागा जोमाने डोलू लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सध्या केळीच्या लागणीला एकरी ३५ ते ४५ टनाचे उत्पन्न मिळते. तर खोडव्याला २५ ते ३० टनांपर्यंत उत्पन्न घेण्यात येते.
कऱ्हाडात तीनच घाऊक व्यापारीकऱ्हाड तालुक्यात केळीच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी त्या प्रमाणात मार्केट मात्र उपलब्ध नाही. सध्या शेतकऱ्यांचा केळीचा माल घेणारे घाऊक व्यापारी जेमतेम तीनच आहेत. त्यांचीही संपूर्ण उत्पादन घेण्याची व ते साठवूणक करण्याची क्षमता अपुरी पडते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना बाहेरची बाजारपेठ परवडत नाही.
शेतकऱ्याला सध्या घाऊक बाजारात सरासरी सहा ते सात रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्याच केळी घाऊक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना १२ ते १३ रुपये किलोने विक्री करतात. तेच विक्रेते ग्राहकांना २५ ते ४० रुपये डझनने केळीची विक्री करतात.

खोडव्याला निम्माच दर...
लागणीच्या पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षीच्या केळीच्या खोडव्याला एकरी २५ ते ३० टनच उत्पादन निघते. या केळीच्या मालाची प्रत लागणीच्या तुलनेत लहान असते. त्यामुळे प्रतिटनाला चार ते पाच हजारांचा दर मिळत आहे.
माणिक डोंगरे

Web Title: Banana farming in sugarcane cultivation vigorous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.