पोलीस ठाण्यासमोरच भरली ‘मंंडई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2016 10:40 PM2016-01-29T22:40:14+5:302016-01-29T23:49:48+5:30
‘आतले-बाहेरचे’ वाद चिघळला : राजवाड्याजवळ ‘रास्ता रोको’नंतर राडा; दोघांविरुद्ध मारहाणीची तक्रार
सातारा : येथील राजवाडा भाजीमंडईत बसणारे विक्रेते आणि बाहेर तीनचाकी टेम्पो लावून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते यांच्यातील वादाने शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण घेतले. ‘रास्ता रोको’नंतर मारामारी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. मारहाणीची तक्रार देण्यासाठी विक्रेत्यांचा संतप्त जमाव शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर रात्री जमला होता. याप्रकरणी पोगरवाडी येथील पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावरील मंडईसमोर काही विक्रेते तीनचाकी टेम्पो उभे करून भाजीविक्री करतात. त्यामुळे आतील व्यावसायिकांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो, अशी त्यांची अनेक दिवसांपासूनची तक्रार आहे. पूर्वी एक-दोन टेम्पो तेथे उभे राहत असत; मात्र आता ही संख्या वाढली असून, नऊ-दहा टेम्पो मंडईबाहेर उभे करून भाजीविक्री केली जाते. याप्रश्नी पालिका आणि वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून दखल घेतली जात नाही, असे मंडईच्या आतील गाळ्यांमध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांची तक्रार आहे.
शुक्रवारी सायंकाळी विक्रेत्यांनी अखेर या प्रश्नावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मंडईसमोरील रस्त्यावर टोपल्या ठेवून विक्रेत्यांनी साडेसहाच्या सुमारास मंगळवार तळे रस्ता रोखून धरला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी हे आंदोलन केले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन मागणीची दखल घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, आंदोलनानंतर बाहेर बसणाऱ्या काही विक्रेत्यांनी मंडईतील गाळेधारकांवर अचानक हल्ला केला आणि मारहाण सुरू केली, अशी त्यांची तक्रार
आहे.
रात्री आठच्या सुमारास गाळेधारकांचा मोठा जमाव शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर तक्रार देण्यासाठी जमला.
मारहाणीत जखमी झालेले रोहित राजेंद्र महाडिक (वय २८, रा. शिवाजीनगर, भैरोबा पायथा, शाहूपुरी) यांनी रीतसर तक्रार दाखल केली. रत्नराज रवींद्र महाडिक आणि रवींद्र चंद्रकांत महाडिक (दोघे रा. पोगरवाडी, ता. सातारा) यांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, राजेंद्र काशिनाथ कदम (रा. सोमवार पेठ) आणि रंजना युवराज महाडिक (रा. सैदापूर, ता. सातारा) हेही जखमी झाल्याचे विक्रेत्यांनी पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)
पोलीस विचारतात, तुम्ही एवढे सगळे एकदम तक्रार द्यायला का आलात? पण आज चार जणांना मारहाण झाली. उद्या आणखी कुणाला मारहाण झाली तर आम्ही कुणाकडे जायचे? म्हणूनच सर्वांना यावे लागले. उलट, हा प्रश्न सुटेपर्यंत राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांनीच सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाहन फिरवायला हवे.
- रंजना देवगुडे, भाजीविक्रेत्या
अतिक्रमणविरोधी पथक येणार...
राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले भाजीमंडईच्या बाहेर टेम्पो उभे करून भाजीविक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे रस्त्याच्या कोंडीबरोबरच गाळाधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, हे गाळेधारकांनी पालिकेला अनेकदा सांगितले आहे. शुक्रवारी या संघर्षाने हिंसक स्वरूप धारण केल्यानंतर विक्रेत्यांनी नगराध्यक्ष विजय बडेकर आणि मंडई विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना दूरध्वनी केला. शनिवारपासून रोज सायंकाळी मंडई परिसरात अतिक्रमणविरोधी पथक येणार असून, रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन निकम यांनी दिल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
मंडईसमोर उभे राहणाऱ्या टेम्पोंची संख्या आता तब्बल सात ते दहा झाली आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. ‘आतील गाळे रिकामे असल्याने तुम्हीही आतच बसा,’ असे आम्ही अनेकदा टेम्पोवाल्यांना सांगितले; मात्र ‘तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे उद्धट उत्तर त्यांनी दिल्यामुळेच आम्ही ‘रास्ता रोको’ केला.
- नासीर शेख, भाजीविक्रेते