कोपर्डे हवेलीतील ‘बंड्या’ बनलाय घरातील सदस्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:59+5:302021-07-20T04:25:59+5:30
कोपर्डे हवेली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना सांगितल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी करणारे आहेत. तसेच बेफिकरीने ...
कोपर्डे हवेली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना सांगितल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी करणारे आहेत. तसेच बेफिकरीने वागणारे आहेत. पण कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील बंड्या नामक श्वान चक्क बाहेर जाताना तोंडाला मास्क लावून बाहेर पडतो, हे उत्तम उदाहरण आहे. जे मास्क वापरत नाहीत त्यांना जणू तो चपराक देत आहे.
पैलवान अक्षय चव्हाण यांचा बंड्या नावाचा श्वान चार वर्षांचा आहे. त्याचा बोलबाला कोपर्डे हवेली परिसरात आहे. तो दुचाकीवरून चव्हाण यांच्याबरोबर फिरत असतो. कधी-कधी त्याला गाॅगल घालतात. निवडणुकीच्या काळात त्याच्या गळ्यात पक्षाच्या चिन्हाची पट्टी बांधून त्याला फिरवतात. पै-पाहुणे, मित्र-मंडळी, कऱ्हाड शहर आदी ठिकाणी जातो. तो चव्हाण कुटुंबाचा लाडका असल्याने सदस्य बनला आहे. तो कुटुंबाबरोबर सण, उत्सवातही सहभागी होतो. रक्षा बंधनाच्या वेळी त्याला घरातील मुली राखी बांधतात, भाऊबिजेला त्याला ओवाळले जाते. तर दीपावलीत त्याला पहाटे अंघोळ घालतात. जेवताना घरच्या सदस्यांबरोबर जेवतो, पाहुण्यांकडे गेला तर पाहुण्यांना पाहुण्यासारखी त्याची ऊठबस करावी लागते, हे सर्व पाहुण्यांच्या अंगवळणी पडले आहे. ज्याला भाऊ नाही त्याने श्वान पाळवा, असे जुनी लोक सांगायची. बंड्या तसाच प्रामाणिक राहून घरच्यांची मने जिंकत आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातून मालकाबरोबर दुचाकीवरून बाहेर पडताना त्याच्या तोंडाला मास्क लावला जातो. तोही मास्क लावून घेतो. दुचाकीवरून जात आसताना पाठीमागे ऐटीत बसलेला असतो. त्यावेळी तो अनेकांचे लक्ष वेधून घेत असतो, तो जणू इतरांना सांगतो की, मी प्राणी असून मास्क लावून लावतो, जे लोक विनामास्क बाहेर पडतात. स्वत:बरोबर दुसऱ्याची काळजी घेत नाहीत. त्यांना बंड्या नावाच्या श्वानाची चपराकच आहे, असे म्हणावे लागेल.
(चौकट)
घरातील सदस्या खातील तेच आहार...
बंड्याला घरातील सदस्य खातील ते जेवण असते. शहाकरी, मांसाहारी, पुरण पोळी, वडापाव, भडंग आदीसह इतर खाद्यांचा सामावेश असतो. घरातच झोपतो. त्याला अंथरुण, पांघरुण असते, तो कायम मोकळा असतो. तो कधीच बांधून नसतो. रात्री तो प्रामाणिकपणे घराची राखण करतो.
कोट...
सर्वांचा लाडका असणारा बंड्या आमच्या घरातील सदस्य बनला आहे. घरात लग्नाचा सोहळा असला तरी तो सहभागी असतो. देवदर्शनासाठी गेलो तरी तो आमच्याबरोबर असतो. कोरोनाच्या काळात काळजी म्हणून आम्ही त्याला मास्क घालतो.
-अक्षय चव्हाण, पैलवान, कोपर्डे हवेली
फोटो ओळ... कोपर्डे हवेली येथील बंड्या श्वानाचा दुचाकीवरून प्रवास मास्क लावून लावतो.