थकबाकीदारांची बँक खाती होणार सील!
By admin | Published: February 26, 2017 12:37 AM2017-02-26T00:37:32+5:302017-02-26T00:37:32+5:30
सातारा पालिका : पाचशे मिळकतदारांना जप्ती वॉरंटच्या नोटिसा
सातारा : मिळकतदारांकडून शंभर टक्के वसुली व्हावी, यासाठी सातारा पालिका नव-नवे फंडे अमलात आणत आहे. करापोटी थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी त्यांचे घर सील करणे, तसेच नळ कनेक्शन आजवर तोडले जात होते; पण आता याबरोबरच बँक खातेही कसे सील करता येईल, यासंदर्भात पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच यावर निर्णय होणार आहे.
सातारा पालिकेमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरलेले पाचशेहून अधिक थकबाकीदार आहेत. या मिळकतदारांना गेल्या आठ दिवसांपूर्वी जप्ती वॉरंट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु तरीही अनेकांकडून थकबाकी जमा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. अशा थकबाकीदारांवर कायद्याचा बडगा वापरून कसल्याही परिस्थितीत वसुली व्हावी, हा हेतू ठेवून पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील गॅस एजन्सी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मिळकतदारांचे बँक खाते आणि मोबाईल नंबर मागविले आहेत. त्यांच्याकडून ही यादी आल्यानंतर संबंधित थकबाकीदारांना सुरुवातीला मोबाईलवर थकबाकी किती आहे, यासंदर्भात ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे. याकडेही दुर्लक्ष केल्यास बँकखात्यातील व्यवहार थांबवून सील करण्यात येणार आहेत. थकबाकीदारांची आर्थिक कोंडी झाल्यानंतर साहजिकच थकबाकी जमा होईल, अशी अपेक्षा वसुली विभागाला आहे. त्यामुळे थकबाकीदारांची सगळ्या बाजूने कोंडी कशी करता येईल, यासाठी कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत कनेक्शन आणि घर सील करणे, यावरच कारवाई मर्यादित होती; परंतु आता ही कारवाई तीव्र होणार आहे.
ही वुसली मोहीम सुरू झाल्यानंतर केवळ आठ दिवसांत तब्बल २५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही मोहीम आणखी तीव्र होणार असून, वृत्तपत्रामध्येही थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षापासून आतापर्यंत एकूण १५ कोटी २० लाख रुपये वसुली मोहिमेतून जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)
मार्च महिन्यामध्ये वसुली मोहीम अतिशय तीव्र करण्यात येणार आहे. थकबाकीदारांची बँकेची खाती सील करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी आपली सर्व थकबाकी पालिकेत येऊन जमा करावी.
-आंबादास वणवे
(वसुली अधीक्षक)