बँक मॅनेजर बोलतोय... ‘एटीएम’चा पासवर्ड सांगा ! ४८ हजाराला लुटले : महिला पोलीस कर्मचार्यासह एकाला गंडा
By admin | Published: May 15, 2014 12:14 AM2014-05-15T00:14:43+5:302014-05-15T00:15:04+5:30
सातारा : ‘बँक मॅनेजर बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, त्यासाठी तुमचा पॅनकार्ड नंबर आणि ‘एटीएम’चा पासवर्ड द्या,’ असे सांगून पोलीस
सातारा : ‘बँक मॅनेजर बोलतोय, तुमचे अकाऊंट अपडेट करायचे आहे, त्यासाठी तुमचा पॅनकार्ड नंबर आणि ‘एटीएम’चा पासवर्ड द्या,’ असे सांगून पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचार्याला आणि एका वृद्धाला ४८ हजाराला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. सर्वसामान्य नागरिक अशा भूलभुलैयाला फसत होते, हे आजपर्यंत सगळ्यांना ठाऊक होते. मात्र, आता पोलीसही अशा ठग्यांच्या फसवणुकीला बळी पडत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या सुनीता श्रीरंग देखणे (वय २६, रा. वाढे, ता. सातारा) यांना काही दिवसांपूर्वी असाच एक फोन आला. त्या व्यक्तीने ‘मी स्टेट बँकेतून मॅनेजर बोलतोय, तुमचे खाते अपडेट करायचे आहे, त्यासाठी तुमचा पॅनकार्ड नंबर आणि ‘एटीएम’चा पासवर्ड द्या,’ असे सांगितले. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देखणे यांनी त्याला सर्व माहिती दिली. दि. ४ रोजी देखणे यांच्या खात्यातून तब्बल ३४ हजार ३०० रुपये काढल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन यासंदर्भात माहिती दिली. दुसराही प्रकार असाच घडला. दादा पांडुरंग कांबळे (८२, रा. वडूथ, ता. सातारा) यांनाही एका व्यक्तीचा फोन आला. ‘गॅस अनुदानाचे पैसे खात्यात जमा करायचे आहेत, तुमचा एटीएम नंबर द्या,’ असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर कांबळे यांनीही एटीएमचा पासवर्ड दिला. दि. ९ रोजी त्यांच्या खात्यातून १३ हजार ६०० रुपये काढल्याचे समजले. बनावट एटीएमद्वारे चोरट्यांनी हे पैसे काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)