बँक कधीच फोन नाही करत, तुम्ही फसताय कसे परत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 05:29 AM2019-11-03T05:29:38+5:302019-11-03T05:29:56+5:30
अधिकाऱ्यांना पडलाय प्रश्न । फोनवर माहिती देताना सतर्क राहण्याची गरज
दत्ता यादव
सातारा : तुमच्या एटीएमची मुदत संपलीय. एटीएम काही वेळात बंद होईल, अशाप्रकारची माहिती सांगून लोकांना संभ्रमात टाकले जाते. एटीएम हे अत्यंत गरजेचे असल्यामुळे फोन आलेल्या व्यक्तीला वेळ न दवडता आणि विचार न करता आपण इत्थंभूत माहिती पटापटा सांगू लागतो. परंतु काही वेळातच आपल्या बँकेच्या खात्यावरून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस येतो, तेव्हाच कळते आपली फसवणूक झालीय. परंतु तोपर्यंत फार वेळ झालेला असतो. मात्र, आपली फसवणूक टाळण्यासाठी फक्त आणि फक्त सतर्कताच तुमच्या कामी येणार आहे. अलीकडे लोकांना फसविण्याचे नवनवीन फंडे पुढे येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘फोन कॉल गंडा.’ या एका फोनमुळे अनेकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून डॉक्टरांपासून व्यावसायिकांपर्यंत कोणीच सुटले नाही.
महिनाभरापूर्वी साताºयातील प्रसिद्ध डॉक्टरांना असाच एक फोन आला. त्यांना संबंधिताने तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे. केवळ तुमचा एक मिनिट द्या, थोडी माहिती हवी आहे. असे सांगितले. डॉक्टरांनी कसलीही विचारपूस न करता संबंधिताला त्यांचे बँक डिटेल्स दिले. परंतु तासाभरानंतर डॉक्टरांच्या मोबाईलवर एसएमएस आला. त्यांच्या खात्यातून तब्बल ६ लाख रुपये काढले गेले होते. हा एसएमएस पाहून डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण उच्चशिक्षित असतानाही अशा प्रकारच्या फोनला बळी पडलो, याचे शल्य त्यांच्या मनामध्ये राहिले.
आपले पैसे गेले यापेक्षा आपण फसलो गेलो, हे समाजाला आणि आपल्या आप्तस्वकीयांना कळू नये, अशी त्यांची धारणा होती. या डॉक्टरांप्रमाणेच अनेक व्यावसायकही अशा फोन कॉल्समुळे फसले गेले आहेत.
वास्तविक अशा प्रकारच्या फोन कॉल्सना उच्चशिक्षित लोकही कसे बळी पडतात, याचे अप्रूप
सगळ्यांनाच असते. परंतु त्यावेळची परिस्थिती, विचार करण्याची क्षमता आणि सतर्कतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा लोकांची फसगत होत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. खरं तर बँकेमधून अशाप्रकारचे फोन केले जातात का? हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते आपल्या बँक खात्याची माहिती देत असतात.
इथेच लोकांची मोठी फसगत होत असते.
काय काळजी घ्याल?
४अनोळखी व्यक्तीने बँक डिटेल्स विचारल्यास
माहिती देऊ नका.
४अनोळखीने मोबाईलवर पाठविलेली कोणतीही लिंक्स उघडू नका. त्या लगेच डिलिट करा.
४बँकेचे खाते, एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड व ओटीपीची माहिती कोणालाही मोबाईलवरून देऊ नका.
४लॉटरी, बक्षीस लागल्याचे ई-मेल, कॉल, एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, त्याकडे दुर्लक्ष करा.
एटीएमची मुदत त्यावर लिहिलेली असते. एटीएमची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर खातेदाराला मेल किंवा पत्राद्वारे कळविले जाते. बँकेत आल्यानंतर खातेदाराला दुसरे एटीएम दिले जाते. परंतु एटीएम खराब आहे की, बंद पडले आहे, हे बँकेला कधीही समजत नाही. फक्त एटीएमची मुदत संपणार आहे, हे बँकेला समजतं. मात्र, बँकेतून फोन कधीही केला जात नाही. एटीएमच्या पाठीमागे सीव्हीव्ही नंबर असतो. तो नंबर कुठल्याही परिस्थितीत कोणालाही देऊ नका.
- सर्फराज शेख, ब्रँच मॅनेजर, एचडीएफसी बँक, सातारा
फसगत होण्याची कारणे..
४घाईगडबडीत फोन उचलून समोरची व्यक्ती कोण बोलतेय, याची चौकशी न करता त्याकडे दुर्लक्ष करणे.
४अनोळखी व्यक्तीला नाही कसे म्हणू, त्याला काय वाटेल, अशी वाटणारी खंत
४बँकेतूनच फोन केला गेला आहे, असे वाटणे.
४बँकेतून फोन करून खातेदाराची माहिती घेतली जात नाही, हे माहिती नसणे.
बँक डिटेल्स मागविण्याचा अधिकार नाही
४‘तुमचे एटीएम बंद होणार आहे. किंवा बंद पडले आहे. सुरू करायचे असेल तर एटीएमचा नंबर सांगा,’ अशा प्रकारचा फोन बँकेमधून कधीच केला जात नाही.
४कारण बँकेलाच नव्हे तर कस्टमर केअरलाही खातेदाराला फोन करून खातेदाराचे बँक डिटेल्स मागविण्याचा
अधिकार नाही.
४समजा तुमच्या एटीएमची मुदत संपणार आहे. त्या वेळी
बँकेतून अगोदरच तुम्हाला पत्र किंवा मेल केला जातो. त्या वेळी
खातेदार बँकेत जाऊन माहिती घेऊ शकतो. परंतु फोनवर अशा प्रकारे कुठलीही माहिती बँक घेत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सायबरतज्ज्ञ अनिकेत
कुलकर्णी यांनी सांगितले.