टेंपोच्या धडकेत बँक अधिकारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:42+5:302021-03-13T05:12:42+5:30
मलकापूर : महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला टेंपोची धडक होऊन झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील हॉटेल ...
मलकापूर : महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला टेंपोची धडक होऊन झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील हॉटेल गंधर्व पॅलेसजवळ आज सकाळी पावणेदहाच्यासुमारास हा अपघात घडला. दरम्यान, अपघातात ठार झालेली व्यक्ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत विस्तार अधिकारी म्हणून काम करत होती. रणजित भाऊसाहेब नाईक (वय ४९, रा. कोयना वसाहत, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणजित नाईक हे कुटुंबासह कोयना वसाहत येथे वास्तव्यास होते. त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुपनेसह विविध शाखेत शाखाप्रमुख म्हणून काम केले होते, तर सध्या मसूर शाखेला विस्तार अधिकारी म्हणून कामावर होते. शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्यासुमारास कामानिमित्त कोल्हापूर दिशेला जाण्यासाठी ते महामार्ग ओलांडून जात होते. त्याचक्षणी कऱ्हाडच्या दिशेने जात असलेल्या टेम्पो क्रमांक ( एमएच ११ सी एच ०१५५ ) ने नाईक यांना जोराची धडक झाली. धडक एवढी जोरात होती की, अपघात होताच नाईक यांना जबर मार लागल्याने महामार्गावरच निपचित पडले होते. अपघाताचा आवाज येताच आसपासच्या नागरिकांनी महामार्गावर धाव घेत इतर वाहने थांबवली. गंभीर जखमी झालेल्या नाईक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले; मात्र अपघातात नाईक यांना जबर मार लागला असल्यामुळे उपचारादरम्यान ते ठार झाले. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार प्रशांत जाधव व खलील इनामदार अधिक तपास करत आहेत.
फोटो : रणजित नाईक