बँका बिनधास्त; ‘एटीएम’ची सुरक्षा ढिसाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:45+5:302021-05-31T04:27:45+5:30

कऱ्हाड : महाराष्ट्र बँकेच्या शेणोली स्टेशन शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आर्थिक संस्था खडबडून जाग्या झाल्या; पण काहीही झाले ...

Banks without hesitation; ATM security weakened! | बँका बिनधास्त; ‘एटीएम’ची सुरक्षा ढिसाळ!

बँका बिनधास्त; ‘एटीएम’ची सुरक्षा ढिसाळ!

googlenewsNext

कऱ्हाड : महाराष्ट्र बँकेच्या शेणोली स्टेशन शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आर्थिक संस्था खडबडून जाग्या झाल्या; पण काहीही झाले तरी एटीएम केंद्रांच्या सुरक्षेबाबत या संस्था गंभीर नाहीत. चोरीच्या घटना वारंवार घडूनही रात्रंदिवस ही केंद्रे सताड उघडी ठेवली जातात. सुरक्षेबाबत संस्थांकडून कसलीच उपाययोजना केली जात नाही, हे दुर्दैव.

राष्ट्रीयीकृत बँकांसह खासगी, सहकारी तत्त्वावर चलणाऱ्या बँका, पतसंस्था तसेच अनेक फायनान्स कंपन्यांच्या शाखा कऱ्हाड शहरासह तालुक्यात आहेत. या शाखांमध्ये दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी विविध बँकांनी ठिकठिकाणी एटीएम सेंटर सुरू केली आहेत. एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही बँकांकडून सुरू आहे. एखाद्या मशीनला तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काही वेळातच बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची दुरुस्ती केली जाते. वारंवार एटीएम मशीनमध्ये पैशाचा भरणाही केला जातो.

पैशाचा भरणा करताना व मशीनची दुरुस्ती करताना काहीवेळ एटीएम सेंटरचा दरवाजा बंद करण्यात येतो. सुरक्षेच्या दृष्टीने केली जाणारी ही तात्पुरती उपाययोजना आहे. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत बँका निरुत्साही आहेत. एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न यापूर्वी कऱ्हाड शहरासह तालुक्यात अनेक वेळा झाला आहे. शेणोली स्टेशन येथेही दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली. मात्र, तरीही बँकांना जाग आलेली नाही. चोरीची घटना घडल्यानंतर बँकांकडून उपाययोजनांचे आडाखे बांधले जातात. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती होते.

- चौकट

देखरेख करायची कुणी?

एटीएम सेंटरना रखवालदार नाहीत. त्यामुळे कधीही आणी कुणीही एटीएममध्ये प्रवेश करू शकतो, अशी परिस्थिती आहे. हटकणारे कुणीही नसल्यामुळे काही वेळा एटीएमच्या परिसरात काही जण तासनतास विश्रांती घेतात. किमान रात्रीच्या वेळी त्याठिकाणी रखवालदार नेमणे गरजेचे असताना बँका त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

- चौकट

सीसीटीव्ही कॅमेरेही नावालाच

एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही असतात. मात्र, काही सेंटरवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरवस्था झाल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी मोडतोड होऊन कॅमेरे लोंबकळत असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी कॅमेऱ्यांवर धूळ साचल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीत सीसीटीव्हीद्वारे चित्रण कसे होणार, हासुद्धा प्रश्न आहे.

- चौकट

‘एटीएम’साठी आवश्यक सुरक्षा

१) चोवीस तास वॉचमन असावा.

२) सीसीटीव्ही यंत्रणा असावी.

३) सीसीटीव्हीमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करावी.

४) काचांना गडद फिल्मिंग नसावे.

५) सेंटरची समोरची बाजू पारदर्शी असावी.

६) बँकेच्या जाहिराती काचांवर असू नयेत.

७) आत व बाहेर विजेची सोय असावी.

८) दरवाजाला ‘कार्ड स्वाइप’ची प्रणाली असावी.

- कोट

एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस यंत्रणेकडून बँकांना पत्र व्यवहार करण्यात येतो. याबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठकही यापूर्वी घेण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक बँका एटीएमच्या सुरक्षेबाबत म्हणाव्या तेवढ्या गंभीर नाहीत. बँकांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- बाळासाहेब भरणे

पोलीस निरीक्षक, कऱ्हाड ग्रामीण

फोटो : ३०केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडातील अनेक बँकांची एटीएम केंद्र अशाच पद्धतीने दिवसा आणि रात्रभर सताड उघडी असतात.

Web Title: Banks without hesitation; ATM security weakened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.