मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर

By नितीन काळेल | Published: May 2, 2023 06:56 PM2023-05-02T18:56:41+5:302023-05-02T18:57:17+5:30

बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही

Banner of Chief Ministership is for political confusion says Rajesh Kshirsagar | मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर

googlenewsNext

सातारा : ‘आमच्याकडे खरेपणा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निकाल आमच्यासारखा लागून सरकारही पाच वर्षे पूर्ण करेल. कारण, बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही. राजकीय संभ्रमावस्थेसाठीच ते लावण्यात आले असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय योजनांची जत्रा व शिवदूत नेमणुकीसाठी क्षीरसागर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘ शासकीय योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासकीय योजनांची जत्रा लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांबरोबरच नव्याने नेमणुका करण्यात येणाऱ्या शिवदुतांचे सहाय्य घेण्यात येईल.

संघटन वाढीवर भर 

राज्यात सत्तांतर होऊन १० महिने होऊन गेले आहेत. या सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. तरीही विरोधकांनी चिखलफेक केली. आमचं काम चांगलं सुरू असून आता त्यांच्याकडे टिका करण्यासारखे काहीच नाही. आता पक्षाचं संघटन वाढीसाठी गाव तेथे शाखा आणि शिवसैनिक यावर भर देण्यात येणार आहे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

पहिल्या निवडणुकीत यश मिळतेच असे नाही

राज्यात शिंदे गटाला किती बाजार समितीत यश मिळाले, पत्रकारांच्या या प्रश्नावर क्षीरसागर यांनी आम्ही आढावा घेत आहोत. अजून आम्ही नवीन आहोत. पहिल्या निवडणुकीत यश मिळतेच असे नाही. आगामी निवडणुकांसाठी चांगली बांधणी करत आहोत, असे सांगितले. तर कास, बामणोली, महाबळेश्वरमधील बांधकामविषयावरील प्रश्नावर त्यांनी याबाबत मला काही माहिती नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

पवार नवीन नेतृत्वाला वाव देत असतील...

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचे वक्तव्य केल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर राजेश क्षीरसागर यांनी शरद पवार हे नवीन नेतृत्वाला वाव देत असतील, असा चिमटा काढला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरवरील प्रश्नावरही त्यांनी राजकीय संभ्रमासाठी प्रकार झाला असावा, असे स्पष्ट केले.

Web Title: Banner of Chief Ministership is for political confusion says Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.