Satara: बनपेठेतील चिमुकले जपतायत सोंग काढण्याची परंपरा; कोयना भागात पारंपारिक पद्धतीने साजरा होतो शिमग्याचा सण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 07:05 PM2024-03-25T19:05:51+5:302024-03-25T19:31:48+5:30
निलेश साळुंखे कोयनानगर: कोयना भागात शिमग्याचा सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासणाला धुलिवंदना दिवशीची सोंग ...
निलेश साळुंखे
कोयनानगर: कोयना भागात शिमग्याचा सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासणाला धुलिवंदना दिवशीची सोंग काढण्याची परंपरा काळानुरुप लोप पावत असली तरी बनपेठ ता. पाटण येथील चिमुकल्यांनी मात्र ही प्रथा कायम राखली आहे.
भारतीय संस्कृतीत सण उत्सवांची परंपराच आहे. ॠतुचक्र, निसर्ग बदल, फळ फुले पीकांसह शेतीच्या कामाला अनुसरूनच संस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात व रीतिरिवाजाप्रमाणे साजरे होत असतात. मराठी वर्षातील शेवट असणाऱ्या होळी (शिमगा) सणाला विशेष महत्त्व आहे. पाच दिवस चालणाऱ्या शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे.
होळी पासून रंगपंचमीपर्यत विविध खेळ व सोंग काढण्याची प्रथा रूढ होती. पुर्वी मनोरंजनाची साधन कमी असल्याने सण उत्सव यात्रा काळात आनंदोत्सव साजरे करताना ऐतिहासिक पौराणिक विनोदी प्रसंगातून विविध रूपात अबालवृद्धसोंग काढुन रात्रभर गावाच्या मुख्य चौकात किवा चावडीवर गावकऱ्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळायचे.
परंतु सध्या आधुनिक अन् ऑनलाईनच्या जमान्यात वाढलेल्या इंटरनेट हस्तक्षेपाने मुलांसह प्रौढवर्गाला खीळवून ठेवले आहे. चौकाचौकातील गप्पांचे फड ओस पडुन खेळाच्या मैदानाऐवजी मोबाईलच्या स्क्रीनकडे टक लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी सण उत्सव व यात्रेतील विविध धार्मिक विधी, गाव बैठकीकडे लोक पाठ फिरवत असलेनं ते काळाच्या ओघात लोप पावले का अशी शक्यता निर्माण झाली आहे. जुन्या चालीरिती, सण उत्सवाची परंपरा व संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.