Satara: ग्राम स्वच्छता अभियानात पुणे विभागात बनवडी ग्रामपंचायत प्रथम
By नितीन काळेल | Published: August 10, 2023 07:07 PM2023-08-10T19:07:21+5:302023-08-10T19:08:56+5:30
बनवडी येथील घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक
सातारा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात २०२०-२१ आणि २०२१-२२ वर्षात पुणे विभागामध्ये कऱ्हाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबाद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावाचे काैतुक केले आहे.
बनवडी येथील घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे. जिल्ह्यातील अनेक गावांनी आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील टीमने या प्रकल्पास भेट दिलेली आहे. या प्रकल्पाचा आदर्श घेऊन अनेक गावांनी बनवडी पध्दतीचा घनकचरा प्रकल्प उभा केला आहे. याच गावातील गांडूळ खतापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. तसेच चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना सौर उर्जेद्वारे चालते हे विशेष आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील या कामगीरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी विजय विभुते आदींनी काैतुक केले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच नरहरी जानराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले.