बनवडी ग्रामपंचायतीला पर्यावरण संवर्धन पुरस्कार : दिल्लीत पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:37 PM2018-06-08T22:37:09+5:302018-06-08T22:37:09+5:30
कोपर्डे हवेली : बनवडी, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायतीस पर्यावरणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच गौरविण्यात आले. दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकरराव खापे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी केंद्रीय समाज कल्याण व न्याय मंत्री रामदास आठवले, जपानचे प्रसिद्ध उद्योगपती सायमा, इंडो जपान कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, राष्ट्रीय नागरी पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विजयराजे ढमाळ, उपाध्यक्ष सुलोचना शिवानंद आदींची उपस्थिती होती.
बनवडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाचे संतुलन राखण्यात यश मिळवल्यानेच पर्यावरण संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्लास्टिक, गटारांची स्वच्छता, वृक्षारोपण, ओला कचरा व सुका कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी व्यवस्थापन, गावातील गटाराची स्वच्छता आदींसह पर्यावरण कामे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्टरितीने राबविली असून, त्याबद्दल ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले.
बनवडी येथील ग्रामस्थ, रहिवाशी, दुकानदार, उद्योजक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, संस्थांचे पदाअधिकाºयांनी गावच्या विकासासाठी नियोजनबद्दल काम केले आहे. गावात नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. याचे फलित म्हणून गावास केंद्राचा पर्यावरण संवर्धन पुरस्कार मिळाला आहे. यामुळे गावाच्या विकासासाठी प्रेरणा मिळणार आहे.
- शंकरराव खापे, माजी सरपंच