बाप्पाच्या निरोपाला जलधारा!
By admin | Published: September 21, 2015 11:32 PM2015-09-21T23:32:20+5:302015-09-21T23:56:51+5:30
गणपती बाप्पा मोरया : महाबळेश्वरात घुमला पारंपरिक वाद्यांचा आवाज
महाबळेश्वर : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा जयघोष, ढोल-ताशे अन् मृदंगाचा निनाद आणि सोबतीला आभाळातून बरसणाऱ्या जलधारा अशा भक्तिमय वातावरणात महाबळेश्वरात पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.महाबळेश्वरात सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरु होती. तरीही गणेश विसर्जनासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी पडला नाही. महाबळेश्वर व परिसरात भर पावसात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वरुणराजाच्या साक्षीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेशाचे येथील सार्वजनिक हौदात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी विविध गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका बाजारपेठतून मार्गस्थ होत होत्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोषाने संपूर्ण बाजारपेठ निनादून गेली होती. मिरवणुकीतील एकता मित्र मंडळाचे ढोल पथक व कोळी आळी गणेशोत्सव मंडळाने पारंपारिक वाद्यांचा गजरात काढलेल्या मिरवणुकीने नागरिकांसह पर्यटकांनाही आकर्षिक केले. विसर्जनासाठी महाबळेश्वर नगर पालिकेच्या वतीने हौद बांधण्यात आला होता. याठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. तसेच निर्माल्यासाठी विशेष कलश ठेवण्यात आला होता. मिरवणुकांचे स्वागत नगराध्यक्ष तोष्णीवाल व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील गणेश मंडळांना अत्यावश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्या दृष्टीने मंडळानी देखील सुरक्षेची काळजी घेतली. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
डॉल्बीला दणका
महाबळेश्वरात दरवर्षी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत फक्त डॉल्बीचाच बोलबाला होता. मात्र, यंदा शहरासह तालुक्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला होता. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वत्र
पारंपारिक वाद्यांचाच गजर ऐकू येत होता.