बाप्पा आले हो साताऱ्याला!

By Admin | Published: September 17, 2015 12:39 AM2015-09-17T00:39:36+5:302015-09-17T00:44:49+5:30

शाहूनगरी सज्ज : सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; पूर्वसंध्येला लाखोंची उलाढाल

Bappa came to Satara! | बाप्पा आले हो साताऱ्याला!

बाप्पा आले हो साताऱ्याला!

googlenewsNext

सातारा / शाहूपुरी : यंदा अनेक गणेश मंडळांनी ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बाप्पांच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे. ढोल, लेझीम व झांझ पथक बाप्पांच्या स्वागतासाठी तयार झाले असून, अनेक गणेश मंडळांनी या पथकांना सुपारीही दिली आहे. दरम्यान, आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी शाहूनगरी सज्ज झाली असून, अनेक गणेश मंडळांची सजावटीची कामे पूर्ण झाली आहे. तर अनेकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाच्या मूर्तीचे वाजत-गाजत आगमन झाले. श्री गणेशाचे गुरुवारी (दि. १७) आगमन होत असून, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत नागरिकांनी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या माध्यमातून शहरात लाखोंची उलाढाल झाली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची बुधवारी येथील राजवाडा, खणआळी परिसरात खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
गणेशाच्या सजावटीसाठी लागणारी रंगबिरंगी थर्माकोलची मंदिरे यासह कारंजे, अंबारी पंती, मूषकरथ, विविध प्रकारचे झोपाळे अशा अनेक वस्तूंची नागरिकांनी खरेदी केली. बाजारपेठेत फुले तसेच फळांची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सराफ दुकानातही गणेशासाठी लागणारे विविध प्रकारचे हार, चांदीचे मोदक, मुकूट अशा वस्तू नागरिकांना आकर्षित करीत असून, या वस्तूंच्या विक्रीसाठी सराफ दुकाने सज्ज झाली आहे.
गणपतीबरोबरच गौराईच्या सजावटीचे साहित्य, दागिने बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. दोन दिवसांनंतर गौराईचे आगमन होत असल्याने सजावटीचे साहित्य महिलावर्गाकडून खरेदी केले जात आहे. (प्रतिनिधी)
आजपासून वाहतुकीत बदल
गणेशोत्सव १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विद्युत रोषणाई, आरास, देखावे तयार केले जातात ते पाहण्यासाठी भाविकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नये अथवा कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दि. १७ ते २५ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात तात्पुरते बदल केले आहेत.
तात्पुरते बदल पुढीलप्रमाणे: राजवाड्याकडून मोती चौक मार्गे समर्थ टॉकीजकडे वाहने जातील; परंतु समर्थ टॉकीजकडून मोती चौकाकडे येणारी वाहने वीज वितरण कार्यालयकडून सुरुची बंगला आर्यांग्ल हॉस्पिटलकडे जातील. (मोती चौक ते वीज वितरण हा रोड एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे), मारवाडी चौक ते सम्राट चौक या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
‘महागणपती’चेवाजत-गाजत आगमन
सातारा शहरातील मानाचा समजल्या जाणाऱ्या सम्राट गणेशोत्सव मंडळाच्या ‘महागणपती’चे
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला वाजत-गाजत आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महागणपतीची ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने नागरिकांना आकर्षित केले.

Web Title: Bappa came to Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.