विदर्भातील भीषण अपघातात साताऱ्यातील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:57 PM2017-09-17T15:57:58+5:302017-09-17T17:30:04+5:30
बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा अपघातात मृत्यू : नागपूर येथे होणाºया स्विमिंग कॉम्पिटिशनला मुलीला घेऊन जात असताना अमरावतीजवळ पुलाच्या कठड्याला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जिल्हा बार असोएिसशनचे अध्यक्ष दीपक गाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा / वर्धा : साताऱ्याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक विठ्ठल गाडे (४०) व आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे अथर्व मिलिंद शिंदे (११) दोन्ही रा. सातारा, अशी मृतकांची नावे आहेत. तर नितीन आनंद माने (४३) आणि माने यांचा मुलगा ओम दोन्ही रा. सातारा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सुत्रानुसार, सातारा जिल्ह्यातील नितीन माने, दीपक गाडे, अथर्व मिलिंद शिंदे आणि माने यांचा मुलगा ओम असे चौघे जण एम.एच. ११/ बी.एच. ४३८३ क्रमांकांच्या कारने नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित जलतरण स्पर्धेकरिता जात होते.
भरधाव कार नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात आली असता ती ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यांवर आदळली. यात दीपक व अथर्वचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कारचालक नितीन माने आणि मुलगा ओम माने हे दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातग्रस्तांपैकी दोघं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे निरज लोही व रंजन पाटील यांनी आपला चमुसह घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला. या घटनेची कारंजा (घा.) पोलिसांनी नोंद घेतली आहे