बारामतीकरांनीच केली साताºयात दुष्काळाची निर्मिती : जयकुमार गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:13 PM2019-06-14T21:13:49+5:302019-06-14T21:15:21+5:30
‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार
सातारा : ‘माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांच्या वाटणीचे पाणी पवारांच्या आदेशाने बारामतीला पळविण्यात आले. पदाच्या लालसेपोटी रामराजेंनी हे पाणी तिकडे जाऊ दिले. आता टँकर पुरवून आणि खासदार निधी देऊन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी खा. शरद पवार पुढे येत आहेत. बारामतीकर पवार हेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळाचे निर्माते आहेत,’ अशी कडवी टीका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. गोरे बोलत होते. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही यावेळी उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘धरणांचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविले जात असताना जिल्ह्यातील नेते मात्र काहीच करत नव्हते. जिल्ह्यातील जनतेने शरद पवार, अजित पवार यांच्यावर जीवापाड प्रेम केले तरी त्यांनी याच जनतेवर अन्याय केला. आता जिल्ह्याची तहान भागत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक थेंबही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली आहे,’ असा इशाराही यांनी दिला. दरम्यान, साताºयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार होते, त्याला इथल्या स्थानिक नेत्यांनीच पाय आडवा घातला, तेच महाविद्यालय बारामतीला झाले, असा आरोपही आ. गोरे यांनी केला.
आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेत्यांनी आपली पदे वाचविण्यासाठी बारामतीकरांपुढे लोटांगण घातले. टेंभू योजनेत वांग-मराठवाडी, कोयना, तारळी धरणांचं पाणी जातं. कºहाड, खटाव या तालुक्यांतून कॅनॉल टाकून हे पाणी खानापूर, तासगाव, सांगोल्याला नेलं आहे. जिल्ह्याबाहेरचे ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र टेंभू धरणामुळे पाण्याखाली आले. मात्र, कºहाड व खटाव तालुक्यातील शेतीला त्याचा फायदा झालेला नाही.’
आमचं ठरलंय ‘त्यांचा’ कार्यक्रम करायचा
भाजप प्रवेशाबाबत विचारले असता आ. गोरे म्हणाले, ‘पक्ष कुठलाही असला तरी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माझ्यात मैत्री कायम राहील. माझ्याबाबतची भाजप प्रवेशाची चर्चा खोटी आहे. अनेकांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला, आता मात्र त्यांना संपविण्यासाठी आमचं ठरलंय!,’ असे आ. गोरे म्हणाले.
तासगावला पाणी गेलं; फलटणला नाही
रामराजेंच्या सहीनं बारामती, तासगाव, खानापूर, सांगोल्याला पाणी नेण्यात आलं. मात्र त्यांची सही फलटणला पाणी आणण्यासाठी उपयोगात आली नाही. या गोष्टीमुळे रामराजेंच्या घरातीलही त्यांच्या जवळ राहणार नाहीत, येत्या काही दिवसांत फलटणसह संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे, असे भविष्यही आ. गोरे यांनी वर्तवले.