कारचा मोह बेतला संदीपच्या जीवावर

By admin | Published: October 31, 2014 11:14 PM2014-10-31T23:14:09+5:302014-10-31T23:17:40+5:30

काळाचा घाला : पुण्यात इमारत कोसळून कार्वेतील युवकाचा मृत्यू

Barely Sandeep's life lies in the face of the car | कारचा मोह बेतला संदीपच्या जीवावर

कारचा मोह बेतला संदीपच्या जीवावर

Next

कार्वे : पुणे येथे इमारतीखाली गाडला गेलेला संदीप मोहिते हा युवक मूळचा कऱ्हाड तालुक्यातील कार्वे गावचा़ स्वत:ची कार सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा मोह त्याला आवरता ना आल्याने जीवाला मुकावे लागले.
नोकरीनिमित्त काही वर्षांपूर्वीच तो पुण्यात स्थायिक झाला़ शुक्रवारी पहाटे ज्यावेळी धरणीकंप झाला, त्यावेळी इतर नागरिकांबरोबरच संदीपही इमारतीमधून बाहेर पडून सुरक्षितस्थळी धावला; पण इमारतीच्या पार्किंगमध्ये असणारी स्वत:ची कार सुरक्षितस्थळी नेण्याचा मोह त्याला आवरता आला नाही़ कार बाहेर काढण्यापूर्वीच इमारत कोसळून संदीप त्याखाली गाडला गेला़
कार्वे येथील संदीप दिलीप मोहिते (वय २५) हा युवक पुण्यात नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत होता़ आंबेगाव-पुणे येथील एका इमारतीत त्याने महिन्यापूर्वी फ्लॅट खरेदी केला़ काही दिवसांपूर्वीच आई-वडिलांसह संदीप त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेला़ दिवाळीच्या सणासाठी आई-वडिलांसह संदीप गावी कार्वे येथे आला होता़
कुटुंबासह त्याने दिवाळी सण साजरा केला़ त्यानंतर नोकरीवर रुजू व्हायचे असल्याने तो त्वरित आई-वडिलांना घेऊन बुधवारी (दि़ २९) पुण्याला गेला़ चांगल्या कंपनीत नोकरी, स्वत:चे राहते घर आणि सोबतीला आई-वडील या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अपेक्षा असतात़
संदीपच्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या; पण त्याला आयुष्यात मोठे ध्येय गाठायचे होते़ त्यासाठी तो धडपडत होता़ अशातच शुक्रवारची पहाट त्याच्यासाठी काळ बनून आली़
गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर संदीपसह त्याचे आई-वडील झोपी गेले़ त्यानंतर पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला़ हा धक्का एवढा जबरदस्त होता की इमारतीमधील बहुतांश रहिवासी घरातून बाहेर पडून सुरक्षितस्थळी धावले़
संदीपही आपल्या आई-वडिलांसह घराबाहेर धावला़ त्यावेळी त्याने नजीकच्या काही शेजाऱ्यांनाही झोपेतून जागे केले़ त्यांना सुरक्षितस्थळी जायला सांगितले़
आई-वडिलांना घेऊन संदीप इमारतीमधून बाहेर पडला खरा; पण इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या आपल्या कारकडे त्याचे लक्ष गेले़ वास्तविक, महिन्यापूर्वीच त्6याने कार खरेदी केलेली़ त्यामुळे कारविषयी त्याला ओढ वाटणे साहजिकच होते़ मात्र, कारचा मोह त्याला मृत्यूच्या जबड्यात घेऊन गेला़
सुरक्षितस्थळी पोहोचलेला संदीप पुन्हा आपल्या कारकडे धावला़ कारमध्ये बसून त्याने स्टार्टर मारला; तोपर्यंत पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला़ त्यामध्ये इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली़ कोणाला काही समजण्यापूर्वीच संदीप गाडीसह दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला़
आई-वडिलांसह नागरिकांनी आरडाओरडा केला़ मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला़ आसपासच्या नागरिकांनी ही माहिती प्रशासनाला कळवली़ प्रशासनाकडून हालचाली होऊन बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनीच संदीपला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालविले़ मात्र, अवाढव्य ढिगाऱ्याखालून संदीपला बाहेर काढणे जिकिरीचे होते़
काही वेळानंतर जेसीबीसह बचाव यंत्रणा त्याठिकाणी पोहोचली़ यंत्रणेने ढिगारा उपसायला सुरुवात केली़ सकाळी सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत बचाव यंत्रणा धडपडत होती़ दुपारी कारसह संदीपला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले़ ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असताना संदीप जिवंत होता, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे़ गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयाकडे हलविण्यात आले़ रुग्णालयात उपचार सुरू असताना संदीपचा दुर्दैवी मृत्यू झाला़ ही घटना कार्वे गावात समजताच गाव हळहळले़ शुक्रवारी दुपारपासून गावात शोकाकुल वातावरण होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Barely Sandeep's life lies in the face of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.