धनणीच्या बागेत रंगतोय पाढ्यांचा बार
By admin | Published: February 2, 2015 09:40 PM2015-02-02T21:40:34+5:302015-02-02T23:59:11+5:30
सातारा : पाढे पाठ करून घेणारा अनोखा उपक्रम
कोंडवे : ‘बोरीचा बार’ तर आपणा सर्वांना चांगलाच माहीत आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खेड गावात एक वेगळीच प्रथा आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजूला गावातील सर्व महिला एकत्र येतात आणि एकमेकांना शिव्या देण्याचा ‘सण’ साजरा करतात. दोन्ही बाजूंनी जोर लावून मोठ-मोठ्यानेओरडून शिव्या दिल्या जातात. याबाबत आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचलेले आहे. याच संकल्पनेचा वापर शाळेत गणितातील पाढे पाठांतर करण्यासाठी करण्यात येत असून, असा अनोखा उपक्रम राबविणारी ही रयत शिक्षण संस्थेची एक उपक्रमशील शाळा आहे.
येथील धनिणीच्या बागेतील कै. रावबहाद्दूर काळे ही ती प्राथमिक शाळा. शाळेचे मुख्याध्यापक अमोल कोळेकर हे स्वत: एक उपक्रमशील शिक्षक असून, त्यांची ही संकल्पना आहे. दररोज परिपाठाला विद्यार्थ्यांचे दोन गट केले जातात, आणि मग गुंजतो तो पाढ्यांचा बार! सर्व विद्यार्थी प्रतिस्पर्धी गटाला हरविण्यासाठी अक्षरश: मोठ-मोठ्याने ओरडून पाढे म्हणतात. एक दिवस २ ते १० तर दुसऱ्या दिवशी ११ ते २० असा ‘पाढ्यांचा बार’ चालतो. त्यानंतर विजेता गट जाहीर केला जातो. ज्या गटाचा आवाज जास्त तो गट विजयी. त्यामुळे दोन्ही गटांतील विद्यार्थी अगदी जीव तोडून मोठ्याने पाढे म्हणत असतो. आपला गट मागे पडू नये, यासाठी सर्वच विद्यार्थी प्रयत्न करीत असतात आणि त्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचे पाढे पाठ होऊ लागले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला परिपाठाची कमालीची उत्सुकता असते. ते ‘पाढ्यांचा बार’ सुरू होण्याची वाटच पाहत असतात.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे २ ते २० पाढे खूप चांगल्या पद्धतीने पाठ होऊ लागले असून, त्यासाठी वर्गात वेगळे पाढे पाठांतर घेण्याची आवश्यकता उरली नाही. अगदी पहिलीतील विद्यार्थीही पाढे गुणगुणताहेत, हे या उपक्रमाचे फलित होय. या अनोख्या उपक्रमात उपशिक्षिका माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, नामदेव क्षीरसागर, विजय माने हे सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी
आहेत. (वार्ताहर)