गुडघ्याला बाशिंग; पण आरक्षणाने निराशा !

By Admin | Published: October 6, 2016 11:37 PM2016-10-06T23:37:25+5:302016-10-07T00:11:26+5:30

कऱ्हाड पालिका नगराध्यक्ष पद : अनुसूचित जाती-जमाती महिलेला पाच वर्षांची ‘लॉटरी’; कोण उतरणार रिंगणात? शहरात चर्चेला उधाण

Bashing knee; But reservations disappoint! | गुडघ्याला बाशिंग; पण आरक्षणाने निराशा !

गुडघ्याला बाशिंग; पण आरक्षणाने निराशा !

googlenewsNext

प्रमोद सुकरे -- कऱ्हाड नगराध्यक्ष आरक्षणाचं घोडं बुधवारी अखेर मुंबईत न्हालं. कऱ्हाड पालिका नगराध्यक्ष पद पुढील पाच वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमाती महिलेसाठी राखीव झाले; पण गेले अनेक दिवस गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची त्यामुळे घोर निराशा झालीय. आरक्षण पडलेल्या प्रवर्गातून कोण-कोण महिला रिंगणात येऊ शकतात, याच्या चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.
गेली २१ वर्षे खुल्या प्रवर्गाची हुलकावणी कऱ्हाडकरांना मिळत आली आहे. २००० मध्ये जयवंतराव पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर खुला प्रवर्ग आलाच नाही. यंदा मात्र खुला प्रवर्ग येईल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र, ती फोल ठरल्याने इच्छुकांची प्रतीक्षा आणखी वाढली, हे निश्चित.
खरंतर मूळच्या आरक्षणानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती-जमाती महिलांसाठी पद राखीव होते. मात्र, फेर आरक्षणात खुल्या प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांच्या आशेवर पाणी फिरले आणि अडीच वर्षांसाठी संधी असणाऱ्या आरक्षणाची अनुसूचित महिलेला दुप्पट संधी मिळाली. फरक फक्त एवढाच झाला की आता त्यांना थेट जनतेमधून कौल आजमावा लागेल.
अनुसूचित महिला प्रवर्गातून अनेक महिलांची नावे आता नगराध्यक्षपदाच्या चर्चेत येऊ लागली आहेत. त्यामध्ये लीना थोरवडे, शीतल वायदंडे आणि पूनम रसाळ या तीन विद्यमान नगरसेविकांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय माजी नगराध्यक्षा बाळूताई सूर्यवंशी, माजी नगरसेवक आनंदा लादे यांच्या पत्नी रूपाली लादे, सुजाता कांबळे यांच्यासह शांताराम थोरवडे, अशोक भोसले यांच्या कुटुंबातील महिलांची नावेही चर्चेत आहेत. मात्र सुशिक्षित आणि उच्चशिक्षित उमेदवार किती मिळणार, याचीही चर्चा सुरू आहे.


दुधाची तहान ताकावर
खरंतर अनुसूचित महिला राखीव नगराध्यक्ष आरक्षण पडल्याने निवडणुकीतील तणाव पन्नास टक्के कमी झाला आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आता दुधाची तहान ताकावर म्हणतात तसेच नगराध्यक्षपदाची तहान नगरसेवक पदावरच भागवावी लागणार आहे.


उमेदवार शोधताना होणार कसरत
अनुसूचित जमातीमधील नगरसेवकांसाठी चार जागांचे आरक्षण पडले आहे. तर नगराध्यक्षपदही अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पॅनेलला या ठिकाणी सक्षम उमेदवार शोधताना कसरत करावी लागणार, हे नक्की.


कोण होणार नगराध्यक्ष ?
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले असले तरी निवडणुका पक्षीय की आघाडी पातळीवर होणार, याचे चित्र स्पष्ट नाही. आघाड्या किंवा पक्षीय पातळीवर निवडणुका झाल्यास किती पक्ष किंवा आघाड्या रिंगणात उतरणार, हे स्पष्ट झाल्यावरच कोणाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किती पाण्यात आहे, हे कळणार आहे.

Web Title: Bashing knee; But reservations disappoint!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.