पाटणमध्ये अनेकांच्या गुडघ्याला बाशिंग
By admin | Published: June 27, 2016 11:17 PM2016-06-27T23:17:49+5:302016-06-28T00:35:42+5:30
जोरदार हालचली सुरू : पाटणकर-देसाई गटांसह भाजपा, मनसेच्याही हालचाली
अरुण पवार-पाटण पाटण नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यांच्या तारखा निश्चित झाल्यामुळे नगरपंचायत निवडणूक लढवायचीच, अशा मन:स्थितीत सारेच राजकीय पक्ष येऊन पोहोचले आहेत. या मुख्य पाटणकर-देसाई गटांसहित भाजपा, शिवसेना, मनसे व इतरांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ नगरसेवक असतील त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष उमेदवार, असे समीकरण झाले आहे.
पाटण तालुक्यात आजी-माजी आमदार जे ठरवतील तीच पूर्वदिशा, अशी स्थिती आहे. याला पाटण नगरपंचायतही अपवाद राहणार नाही. तरीही सध्या केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपा-सेना या पक्षांनाही काही दिवसांपासून पाटण तालुक्यात बाळसे धरू लागले आहे. दोन्ही पक्षांनी नगरपंचायत निवडणुकीत उडी मारायचं, असे ठरवले आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा आमदारकी असो, पक्ष निवडणुका लढवत आला आहे. आता सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे, ती पाटणकर गटासाठी; कारण नगरपंचायत निवडणूक ही माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. मग यामध्ये विरोधक म्हणून समोर उभे ठाकणाऱ्यांना निवडणुकीपूर्वीच कसे गारद करायचे? हे आव्हान आणि कसब पाटणकर गटासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. तर आमदार शंभूराज देसाई यांना निवडणूक लढवायची असेल तर प्रत्येक प्रभागात एकूण १७ सक्षम उमेदवार मिळविणे कसोटीचे ठरेल आणि ते त्यात यशस्वी ठरले तर मात्र नगरपंचायत निवडणूक अटीतटीची होईल.
ते परिवर्तन पॅनेल लक्षवेधी
पाटण शहरात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. या पॅनेलचे नगरपंचायत निवडणुकीतील भूमिका लक्षवेधी ठरणार, असे दिसत आहे.