‘कास’चा मृतसाठा सातारकरांचा आधार
By admin | Published: July 12, 2014 11:44 PM2014-07-12T23:44:53+5:302014-07-12T23:48:38+5:30
पाणीकपात वाढणार : पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज
सातारा : कास तलाव भरण्यासाठी आवश्यक असणारा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. सध्या तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे तलावातील मृत साठ्याचा आधार घ्यावा लागत आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या सात जलवाहिन्या पूर्णपणे बंद केल्या.
जिल्ह्यातील बऱ्याचशा नगरपालिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसाआड किंवा चार दिवसांतून एकदा असा पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी कपातीसंदर्भात साताऱ्यातील चित्र वेगळे आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात दुथडी भरून वाहणाऱ्या कास तलावाने यावर्षी मात्र तळ गाठला आहे. अपेक्षित प्रमाणात पाऊस न पडल्याने तलावातील पाणीपातळीत फारशी वाढ झाली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वाहून जाणारे पाणी इंजिनच्या साह्याने पुन्हा तलाव पाटात टाकल्याने पाणीकपात उशिरा झाली सध्याही असेच प्रयत्न सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, तलावात पाणीसाठा कमी असल्याने त्यावरही मर्यादा आल्या.
दोनवेळा करण्यात येणारा पाणीपुरवठा एकवेळ करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही भीषण पाणीटंचाईचे संकट आ वासून समोर असल्याने कास तलावातील मृत पाणीसाठा उचलण्याचा विचार पाणीपुरवठा विभाग करत आहे. सध्या कास तलावात एकूण साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. ४ फुटापर्यंतचे पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचते. पावसाने जोरदार सुरुवात केल्यास पाणी टंचाईची भीती राहणार नाही. (प्रतिनिधी)