नियतीनं हिरावला चिमुकल्यांचा आधार
By Admin | Published: November 2, 2014 12:38 AM2014-11-02T00:38:03+5:302014-11-02T00:39:33+5:30
सिद्धी-साईची करुण कहाणी : पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने मृत्यूला कवटाळे; वडिलांनीही केले दुर्लक्ष
सातारा : आई तुझे लेकरू वेडे गं कोकरू... रानात फसलं, रस्ता चुकलं... सांग मी काय करू, या गीताची आठवण करून देणारा प्रसंग जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पाहायला मिळत आहे. आई-वडिलांविना मायेच्या आजीसमवेत या चिमुकल्यांना भविष्याचा आराखडाही मांडता येत नाही. शरीरावरील जखमा बऱ्या होतील; पण मनावर झालेल्या जखमा बऱ्या कशा होणार? असे भाव या चिमुकल्यांच्या डोळ्यांत दिसत आहेत.
दिवाळीचा झगमगाट, आनंदाचे उधाण, दिव्यांचा प्रकाश असे सर्वत्र वातावरण असताना कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील विवाहिता सुजाता राजेंद्र पवार (वय ३३) यांनी पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून दि. २५ रोजी घरातच पेटवून घेतले. आईच्या अंगावरील ज्वाळा पाहून चार वर्षांची चिमुकली सिद्धी आईला वाचविण्यासाठी धावली; परंतु चिमुकल्या हातांची मदत अपुरी पडली. या घटनेत माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. दुर्दैवाने आईचे दुसऱ्या दिवशी निधन झाले. तर २५ टक्के भाजलेल्या सिद्धीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचारी कर्तव्य भावनेने काम करत आहेत.
याबाबत सुजाता पवार यांचे बंधु तुषार लक्ष्मण साळुंखे (रा. अंबवडे सं, ता. कोरेगाव) यांनी माहिती दिली की, तेरा वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचा विवाह बिचुकले येथील शेतमजूर राजेंद्र पवार यांच्याशी झाला. राजेंद्रला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन सुजाताला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. ती आत्महत्येस प्रवृत्त व्हावी म्हणून त्याने घरातील भांडी विकायला सुरुवात केली होती. त्यामुळे सुजाताने पेटवून घेतले. राजेंद्र पवारने सुजाताला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजेंद्रवर गुन्हा दाखल होऊन आठवडा झाला तरी अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही.
अशा माणसाला कायद्याने शिक्षा होईल, पण समाजाने निराधार झालेल्या चिमुकल्यांना आधार देण्याचे काम केले तर त्यांचे आयुष्य सावरेल, अशी अपेक्षा अंबवडेचे उपसरपंच संजय साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित जगताप व भाजपा जावळी तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मदतीवरच त्यांचे उमलते आयुष्य सावरणा आहे. (प्रतिनिधी)