माता-पित्यासाठी लेकीनं बांधलं स्वत:च्या हातानं स्वच्छतागृह
By Admin | Published: June 4, 2017 01:09 AM2017-06-04T01:09:47+5:302017-06-04T01:09:47+5:30
लग्नाचा पाचवा वाढदिवस असाही सत्कर्मी : कवठेत तेजस्वीचं समाजाचे डोळे दिपवणारं कर्तृत्व; जन्मदात्यांसाठी अनोखी भेट
विनोद पोळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे : गावकऱ्यांनी निर्मल ग्रामचा ध्यास घेतलेला. घरात स्वच्छतागृह बांधण्याचा आग्रह धरला जात होता. पण, वडिलांची परिस्थिती बेताचीच असल्याने ते असमर्थ होते. हे न पहावल्याने माहेरी आलेल्या तेजस्वीने आईवडीलांसाठी स्वच्छतागृह बांधून स्वत:च्या लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाची भेट दिली.
कवठे येथील शिवाजी सूर्यवंशी यांची कन्या तेजस्वी हिचा विवाह पाच वर्षापूर्वी अतीत येथील विजय मोरे यांच्याशी झाला. विजय मोरे हे मुंबई येथे नोकरीस असल्याने स्वत:च्या मालकीच्या घरात मुंबई येथे तेजस्वीचा संसार सुरु झाला.
वडील कवठे येथे रंगकाम करून कुटुंबाची गुजरान करीत असल्याने परिस्थिती तशी जेमतेमच. पदरी दोन मुली व एक मुलगा त्यातच मुलीच्या लग्नाचे कर्ज डोक्यावर असल्याने घराच्या बांधकामाची इच्छा असून पैशापुढे इलाज चालत नव्हता.
उन्हाळा सुटीनिमित्त मुंबईहून माहेरी महिन्याभरासाठी तेजस्वी आली. कवठे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वडिलांना बोलावून घेऊन स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यास सांगितले. वडिलांनी दुष्काळी परिस्थितीने शेतीचे काहीच उत्पन्न नसल्याने व रंगकामात मंदी असल्याने शौचालय बांधण्यास असमर्थता दर्शविली.
पावसाळाजवळ आल्याने ओढ्यालगत असलेल्या घरात पावसाचे पाणी दरवर्षीच शिरायचे. त्याचा त्रास, शौचालय नाही त्यामुळे कुटुंबाला होणारा त्रास तेजस्वीच्या समोर घडत असल्याने तेजस्वी विचार करू लागली आणि कोणतेही जुजबी प्रशिक्षण नसतानाही तिने स्वत:च बांधकाम करावयाचा निर्धार केला. ही कल्पना आई सुमन व भाऊ अक्षयच्या कानावर घालून शौचालय बांधणीसाठीचे साहित्याची जुळवाजुळव करण्यास कुटुंबात सांगितले.
स्वत: पुढाकार घेऊन आपल्या लग्नाच्या वाढदिवशी शौचालय, तसेच घरास संरक्षक भिंत बांधून अनोखी भेट दिली.
निर्मल ग्रामसाठी शासन विविध योजना आणत आहे. जनतेतून जनजागृती केली जाते. अनुदान दिले जाते. पण ग्रामस्थांमधून म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, कवठे येथील तेजस्वी हिने दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करुन आई-वडिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला. हा समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे. आता समाजानेही पुढे येण्याची गरज आहे.