महाबळेश्वर तालुक्यात प्रस्थापितांच्या इर्षेची लढाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:31 AM2021-01-09T04:31:47+5:302021-01-09T04:31:47+5:30
पाचगणी : महाबळेश्वरच्या ऐन थंडीत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, धूमशान सुरू झाल्याने वातावरण खूपच तापले आहे. ...
पाचगणी : महाबळेश्वरच्या ऐन थंडीत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, धूमशान सुरू झाल्याने वातावरण खूपच तापले आहे. तालुक्यात २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, १४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांच्या जागा बिनविरोध प्रक्रियेत येत नसल्याने प्रतिष्ठा जपण्याकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाईच ठरणार आहे. त्यामुळे भिलारच्या निवडणुकीने मात्र संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे तर महाबळेश्वर तालुक्यात या चौदा ग्रामपंचायतींमध्ये एखाद्या दुसऱ्या जागेसाठी निवडणुकीचा बार उडणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली होती. यामध्ये २८ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक गावनेत्यांना यामध्ये यश आले आहे तर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींमध्ये अंशत: निवडणूक प्रक्रिया एखाद्या दुसऱ्या जागेसाठी लागली आहे. तेही गावकी व भावकीमधील इर्षेपोटी मला संधी का नाही..? तर प्रत्येक वेळेस तुमची का..? म्हणून या चौदा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक वर्षाच्या अंतरावर आली आहे, त्याचीही रंगीत तालीमच आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे भाग आहेत. एक कोयनेच्या दऱ्याखोऱ्याचा भाग तर पूर्व विकसित भाग आहे. पूर्व भागात अतिशय महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भिलार व राजपुरी या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशतः का होईना लागल्या असल्याने येथील स्थानिक नेत्यांना तो आत्मचिंतन करण्याचा विषय झाला आहे. त्यामुळे त्यांना आपला उमेदवार निवडून आणण्याकरिता मोठी कसरत करावी लागणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
(चौकट )
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती
भिलार, कासवंड, कुरोशी, अकल्पे, आंब्रळ, गोडवली, दांडेघर, क्षेत्र महाबळेश्वर, राजपुरी, कुंभरोशी, वाळणे, खिंगर, कुट्रोशी, सौंदरी
(चौकट..)
बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती
जावळी, अहिर, भेकवली, भौसे, बिरवाडी, हातलोट, माचूतर, शिरवली, तळदेव, झांजवड, हरचंदी, आमशी, पाली त आटेगाव, सोनाट, उंबरी, वारसोळीदेव, वेळापूर, भीमनगर, दाभेदाभेकर, बिरमणी, चतुरबेट, चिखली, दानवली, धावरी, नाकिंदा, पारपार, मेटतळे, गावढोशी