लोकसभेच्या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:09 PM2019-04-24T23:09:14+5:302019-04-24T23:09:20+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. ...
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेले लोकसभेचे कुरुक्षेत्र मंगळवारी मतदानानंतर शांत झाले. लोकसभेच्या या रणांगणात विधानसभेचा युद्धसराव सुरू असल्याचे पदोपदी जाणवले. आता कोण किती पाण्यात आहे, ते २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची ठरली. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने जोरदार तयारी केलेली या निवडणुकीत पाहायला मिळाले. १९९९ च्या पराभवानंतर युतीने हा मतदारसंघ लढला. मात्र, युतीने जितकी ताकद यंदा लावली, तेवढी ताकद यापूर्वी अपवादानेच लावली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला धक्का देण्याचे तंत्र भाजप-शिवसेनेने राबविले. युतीने अत्यंत विचार करून याठिकाणी उमेदवार दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिवाकर रावते आदींच्या मोठ्या सभा सातारा मतदार संघात घेण्यात आल्या.
लोकसभेची ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वच आमदार व विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाºया उमेदवारांसाठी रंगीत तालीमच ठरली. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, वाईचे आमदार मकरंद पाटील, साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कºहाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी खासदार उदयनराजेंसाठी शर्थीचे प्रयत्न केले. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पक्षाची जबाबदारी म्हणून नरेंद्र पाटील यांचे काम केले. तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचे संभावित उमेदवार समजले जाणारे महेश शिंदे (कोरेगाव), पुरुषोत्तम जाधव, मदन भोसले (वाई), मनोज घोरपडे (कºहाड उत्तर), अतुल भोसले (कºहाड दक्षिण), दीपक पवार (सातारा-जावळी) यांनी नरेंद्र पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी धावाधाव केली. पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे संभावित उमेदवार सत्यजित पाटणकर यांनीही खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने आपली ताकद लावली.
सर्वच उमेदवारांनी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युती अथवा आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी या उमेदवारांनी प्रयत्न केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरच या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
काही मतदार संघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. साहजिकच विधानसभा मतदार संघातील मतांच्या आकडेवारीला महत्त्व आहे. याचा अभ्यास करूनच विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याने संभावित विधानसभा उमेदवारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागले आहे.
मुख्य लढत राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यातच होणार आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही निकराची लढत दिली असल्याने ही आघाडी अधिक मते घेण्याची शक्यता आहे. आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या मतदारांनी घेतलेले मतदान नेमके कुणाला फायद्याचे आणि कुणाच्या तोट्याचे, हे २३ मेनंतरच स्पष्ट होणार आहे.
ऐनवेळीच घडलं-बिघडलं
खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीला सुरुवातीला पक्षांतर्गत विरोध झाला होता. बारामती, पुणे, मुंबईत अनेक बैठका झाल्या. शेवटी उदयनराजेंच्याच नावावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून सर्व आमदारांनी एकजुटीने उदयनराजेंचे काम केले. दरम्यान, युतीतही अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला या मतदार संघातून दोनवेळा लढलेले पुरुषोत्तम जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पुन्हा एकदा शिवबंधन धागा बांधला गेला होता. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार, असे वातावरण असतानाच अचानकपणे भाजपचे नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी घडतंय-बिघडतंय, असे चित्र सातारा लोकसभा मतदार संघात पाहायला मिळाले.
वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा?
गत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला होता. वाढलेला टक्का उदयनराजे भोसले यांच्यासाठी फायद्याचा ठरला होता, यंदाही चार टक्क्यांनी मतदान वाढले आहे, हे वाढलेले मतदान कुणासाठी पोषक ठरणार? याबाबत मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे. वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ९९ हजार २५२ इतके मतदान झाले. त्या खालोखाल सातारा-जावळी मतदार संघातून १ लाख ९८ हजार १५५ मतदान झाले. कºहाड दक्षिण व कºहाड उत्तर या दोन मतदार संघातूनही मतदानाचा टक्का वाढला.