बाजार समिती निवडणूक: उदयनराजेंची बळीराजाला साथ, शिवेंद्रसिंहराजेंना शह
By नितीन काळेल | Published: April 20, 2023 08:09 PM2023-04-20T20:09:38+5:302023-04-20T20:09:53+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली भेट
सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून दुरंगी लढत होत आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ देत एकप्रकारे सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना शह दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.
सातारा बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. एकूण १८ जागा आहेत. या संस्थेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची ३० वर्षांपासून सत्ता आहे. या सत्तेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या या लढ्याला व पॅनेलला खासदार उदयनराजेंंनी साथ, पाठिंबा द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोसले, अर्जून साळुंखे यांच्यासह शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी उदयनराजेंबरोबर सविस्तर चर्चा झाली.
जगाचा पोशिंदा भरडला जातोय. त्यांच्या हक्कांना डावललं जातंय, शेतकरी संघटना या राजवटीच्याविरोधात लढत असून फक्त लढ म्हणा... अशी भावनिक साद स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना घातली. त्यानंतर उदयनराजेंनीही ताकदीने पॅनल उभे करा. हम करेसो कायदा म्हणणाऱ्यांना जागा दाखवा, असे स्पष्ट केले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच बळीराजाचे बळ आणखी वाढले आहे. तर खासदार उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे आव्हान उभे राहणार आहे. उदयनराजेंची ताकद बळीराजाला मिळणार असल्याने निवडणूकही रंगतदार होणार आहे.
सातारा या राजधानीत खऱ्याअर्थाने बळीराजाचं राज्य येण्यासाठी खासदार उदयनराजेंचा आशीर्वाद मिळाला आहे. यामुळे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे कधी उसाच्या तर कधी टक्केवारीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी खऱ्याअर्थाने बाजार समितीवर मालक म्हणून बसलेला दिसेल.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना