सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी बीबीएफ पेरणी गरजेची : विजयकुमार राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:31+5:302021-06-10T04:26:31+5:30
नागठाणे : ‘ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज ...
नागठाणे : ‘ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे,’ असे प्रतिपादन कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले. नागठाणे येथील कल्पना खंडाईत यांचे शेतात बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिक शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषिभूषण मनोहर साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे, कृषी अधिकारी अनिल महमूलकर, युवराज काटे, रोहिदास तिटकारे, गणेश साळुंखे, आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, ‘रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी केल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर ३ ओळीत पेरणी होऊन दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर आणि दोन रोपातील अंतर १५ सेंटिमीटर राखले जाते. त्यामुळे सोयाबीनचे एकरी फक्त १५ ते १६ किलो बियाणे लागते. रुंद वरंबाच्या दोन्ही बाजूला सरी तयार होते. त्यामुळे अतिवृष्टीमुळे साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. तसेच पाऊस कमी पडला तर मूलस्थानी जलसंधारण होऊन ओलावा टिकून राहतो. त्यामुळे पिकाचे दोन्ही नुकसान होत नाही. प्रत्येक चार ओळींनंतर रिकामा पट्टा राहिल्याने हवा खेळती राहून भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. आंतरमशागत सहज करता येते. मूग, उडीदसारखे आंतरपीक सापळा पीक म्हणून घेता येते. त्यामुळे पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव कमी राहून उत्पादन वाढते. बियाणे, खत, मजूर खर्चात बचत होऊन २० ते २५ टक्क्य़ांनी सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांचे २० ते २५ टक्क्य़ांनी उत्पादन वाढते. त्यामुळे बीबीएफ पेरणी पद्धत ही आता विक्रमी उत्पादनासाठी गरजेची झाली आहे.’ अशाप्रकारची बीबीएफ पद्धतीने पेरणी प्रात्यक्षिके ४०० एकर क्षेत्रावर नागठाणे व परिसरातील गावात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्याची माहिती कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी यावेळी दिली.