टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान; पोटविकार वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:50+5:302021-06-16T04:49:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टीव्ही पाहत, वाचन करत, जेवण करणे म्हणजे थेट पोटविकारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. असे केल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : टीव्ही पाहत, वाचन करत, जेवण करणे म्हणजे थेट पोटविकारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. असे केल्याने आपण काय खाताेय हेच लोकांना समजत नाही. त्यातून अपचनापासून पोटाचे अनेक विकार आणि पर्यायाने त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
कोरोना विषाणूचा परिणाम फुप्फुसांवर झाला, तसा तो आतड्यांवरही झाला आहे. कोविडमधून बरे झालेल्यांना त्यांच्या शरीरातील रक्ताची जाडी वाढल्याचे आढळते. त्यातून रक्ताच्या गुठळ्या वाढल्या. असेच रक्त जिथे जाईल तिथे गाठी तयार झाल्याने हृदयविकार आणि याच गुठळ्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये झाल्या तर अर्धांगवायूचा धोकाही वाढतो.
लॉकडाऊनमध्ये लोकांचा बाहेर जाऊन व्यायाम बंद झाला आहे. पण बाहेर खाता येत नाही म्हणून घरातच चमचमीत पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार मात्र सर्रास वाढले होते. घरात चालता फिरता खाण्यामुळेही पोटाचे विकार वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
१. पोटविकाराची प्रमुख कारणे
बदललेली जीवनशैली पोटविकार वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. यात प्रामुख्याने जेवण करताना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची वाईट सवय जवळपास सर्वच वयोगटाला लागली आहे. जेवणाकडे लक्ष नसेल तर अन्न किती वेळा चावतोय, ते नीट चावलं गेलंय का याचे भान राहत नाही. परिणामी पोटाचे किरकोळ विकार सुरू होतात.
२. पोटविकार टाळायचे असतील तर...!
जेवण करताना मानसिकदृष्ट्या आपण त्यात गुंतणं आवश्यक आहे. टीव्ही मोबाईल बघत जेवण सुरू असेल तर त्याचा पचनक्रियेवर भलताच परिणाम जाणवतो. मानसिकदृष्ट्या जेवणात आपण एकरूप नाही झालो तर लाळ तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. लाळ जेवढी चांगली जेवणात मिसळते तेवढे चांगले पचन होते. तुमचे पोट चांगले असेल तरच एकूण आरोग्य चांगले राहते.
कोट :
गृहिणी
१. मुलाने भरपूर जेवावं म्हणून माझ्या अनेक मैत्रिणी त्यांना यूट्यूबवर कार्टून लावतात. मुलंही कार्टून बघत जेवतात, पण ते त्यांच्या किती अंगी लागतं हा प्रश्न आहेच. आम्ही स्वयंपाकघरातच जेवतो, त्यामुळे दिवसभरातील घडामोडींच्या गप्पा होतात.
- श्वेता जंगम, गृहिणी
२. माझा मुलगा दीड वर्षांचा आहे. त्याला खायला घालणं हा कौटुंबिक सोहळा असतो. मैत्रिणींना सल्ला दिला त्याला मोबाईल दाखव. पण आम्ही त्याला त्याची खेळणी दाखवून त्यांच्याशी त्याला गप्पा मारत खायची सवय लावली. आता तो खाताना त्रास देत नाही.
- तेजश्री कणसे-जाधव, गृहिणी
३. पती कामावर गेल्यावर मी आणि बाळ आम्ही दोघीच असतो. मोबाईलवर तिच्या आवडीचं कार्टून लावल्याशिवाय ती जेवतच नाही. ही सवय शाळेत गेल्यावर मोडेल असं वाटलं पण लॉकडाऊनमुळे तेही शक्य होईना.
- प्रणिता कुलकर्णी, गृहिणी
कोट
१. भूक लागली म्हणून अन्न खाणं किंवा जेवणं ही तांत्रिक प्रक्रिया नाही. तुमचं खाणं आणि ते योग्य पध्दतीने पचवणं ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेवताना चित्त शांत ठेऊन त्याचा आस्वाद घेतल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राखलं जाते.
- डॉ. प्रतापराव गोळे, पोटविकारतज्ज्ञ, सातारा
२. पहिल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम पोटाच्या आरोग्यावर झाला. घराबाहेर पडत नसल्याने बहुतांशांनी घरचं पचणारं अन्न आणि पाणी पिलं. पार्ट्या कमी झाल्याने अपेयपान कमी झाल्याने पोटाचे आरोग्य ठणठणीत होते. दुसऱ्या लाटेत लोकांनी पळवाटा शोधल्या आणि पोटाचे विकार वाढले.
- डॉ. संदीप श्रोत्री, पोटविकारतज्ज्ञ
............