ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:05+5:302021-09-15T04:45:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अधिकतर तरुण-तरुणी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने आता जोडीदार शोधतानाही या सोशल मीडियाची मदत घेतली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अधिकतर तरुण-तरुणी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने आता जोडीदार शोधतानाही या सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. मात्र, यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून गेल्या तीन वर्षांत २१ जणांचा खिसा पिवळे हात होण्याआधीच रिकामा झाला आहे. यामध्ये विशेषत: विवाह ठरवणाऱ्या एजंटांकडूनही लुटालूट होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
खरं म्हणजे विवाह हे एक पवित्र बंधन असतं. नात्यातलं मांगल्य विवाह संस्थेतूनच राखता येतं. त्यामुळे आपल्या संस्कृतीत विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. शतकानुशतके विवाह संस्थेचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न समाजपातळीवर झाला आहे. मात्र, अलीकडे ही विवाह संस्था मोडीत निघते की काय, अशी भीती व्यक्त होतेय. त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेले सोशल मीडियाचे भूत. तरुण पिढी सोशल मीडियावर ओळख झाली की लगेच विवाह ठरवताहेत. पण दुसरीकडे अनेकांची फसवणूकही होत आहे. सुंदर मुलीचा फोटो ठेवून मुलांना आकर्षित केले जाते. पण वास्तविक हा फोटो एखाद्या मुलाचाच असतो. त्याच्या भावनेला हात घालत आर्थिक मागणी केली जाते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुले पैसे देतात. नंतर मात्र, जेव्हा समजतं ती नव्हे तर तो होता. तेव्हा मात्र, पश्चात्तापाची वेळ येते. असे अलीकडे बरेच प्रकार घडल्याचे पाहायला मिळतेय.
चाैकट : ही घ्या काळजी...
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
चॅटिंगमधून बोलताना पैशांची मागणी झाल्यास सतर्क राहा.
पैसे न देता तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा.
वैयक्तिक फोटो अनोळखी व्यक्तीला पाठवू नये.
चाैकट : अशी होऊ शकते फसवणूक
१) तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुमची वैयक्तिक माहिती घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला ब्लॅकमेल केले जाते. परिणामी पैशांची मागणी होते. अनेक जण आपली बदनामी होइल, या भीतीपोटी मागेल तेवढे पैसे देतात. त्यामुळे ही वेळ येऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे.
२) सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर समोरून विवस्त्र फोटोची मागणी होते. अशा वेळी कोणत्याही मोहपाशात न अडकता थेट सायबर सेलशी संपर्क साधणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीचा ब्लॅकमेल करण्याचा हेतू असतो. तसेच विवाह ठरविणाऱ्या एजंटांचाही आता सुळसुळाट झालाय. हे एजंट विवाह ठरविण्यासाठी पन्नास हजारांपासून तब्बल दोन लाखांपर्यंत पैसे घेत आहेत. अशा एजंटांपासूनही सावध राहायला हवे.
कोट : ऑनलाइन जोडीदार शोधताना अनेकांची फसवणूक झालीय. संबंधितांनी समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवून आपली वैयक्तिक माहिती त्यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केले गेले. रोज एक तरी तक्रार सायबर सेलकडे येत असते. यावर सतर्कता हाच एकमेव फसवणूक टाळण्याचा उपाय आहे.
- अजय जाधव, सायबर सेल तज्ज्ञ, सातारा