देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी सनदधारकांच्या नावे कराव्यात
By admin | Published: July 17, 2017 02:49 PM2017-07-17T14:49:34+5:302017-07-17T14:49:34+5:30
सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विजयराव पोरे यांची मागणी
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १६ : बहुतांशी गुरव समाज हा देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीवर उदरनिर्वाह करीत असून, या जमिनी सनदधारकांच्या नावे कराव्यात, अशी मागणी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विजयराव पोरे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यामध्ये गुरव समाज ४० लाखांवर असून, सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचे प्रमाण सुमारे ४२ हजार आहे. बहुतांशी गुरव समाज हा देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करतो.
१९९२ मध्ये पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले असून, त्यामध्ये देवस्थानसाठी वहिवाटदार पुजारी नेमले असून, जमिनीची वहिवाट करून उत्पन्न घेऊन उदरनिर्वाह व देवाची पूजा, अर्चा आणि देखभाल करण्याचा हक्क दिला आहे. राज्य शासनाच्या १९९६ च्या परिपत्रकानुसार इनाम वर्ग ३ च्या जमिनी देवस्थानच्या ताब्यात राहणे व त्याची देखभाल करणे हा हेतू आहे. पण, काही जमिनींची विक्री होऊन अनधिकृत हस्तांतरित झाल्या आहेत.
जमिनीच्या इनामपत्रात आणि सनदमध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनींची अनधिकृत विक्री झालेली आहे. त्यामुळे देवस्थानची देखभाल करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर हस्तांतरित झालेल्या जमिनी त्वरित मूळ वहिवाटदार म्हणजेच सनदशीर हक्क असलेल्या गुरव (पुजारी) समाजाच्या नावे करून द्याव्यात.
या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरील वहिवाटदार गुरव यांचे नाव कमी करून इतर हक्कात लावली आहेत. ती पुन्हा कब्जेदार म्हणून लावावीत, अशी आमची मागणी आहे.