साताऱ्याचा स्मार्ट सिटीत समावेश करावा
By admin | Published: May 25, 2015 10:48 PM2015-05-25T22:48:45+5:302015-05-26T00:54:36+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : हद्दवाढ प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सातारा : ‘झपाट्याने विस्तार होत असलेल्या सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा राज्य शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभाग करावा. सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी, यासह सातारा पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मिळावा. वेणेखोल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवावा,’ अशी मागणी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, नगराध्यक्ष सचिन सारस, नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले, रवी माने, जयंत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा-जावळी मतदारसंघाच्या वतीने आणि सातारकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर मुख्यमंत्र्यांनीही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
‘सातारा शहराला ऐतिहासिक वारसा असून, निसर्ग संपन्नतेने नटलेल्या सातारा शहराच्या विस्तारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहराच्या आजूबाजूला उपनगरांचा झालेला विस्तार आणि लोकसंख्या वाढीच्या मानाने सातारा नगर पालिकेच्या उत्पन्नात आवश्यक अशी वाढ होत नसल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविणे अडचणीचे ठरत आहे. सातारा शहरालगत अनेक पर्यटन स्थळे आहेत. विशेषत: जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कास, ठोसेघर, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड आदी पर्यटन व धार्मिक स्थळे, महामार्ग आदी तत्सम बाबी लक्षात घेता सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातारा शहराचा शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सातारा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश करावा,’ अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
‘सातारा पालिकेने हद्दवाढ प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह नगरविकास विभागाकडे सादर केलेला आहे. शहरालगतच्या हद्दवाढ क्षेत्रामध्ये नियोजनबद्धरीत्या नागरी सोयीसुविधा व नियंत्रित विकास होण्याच्या दृष्टीने हद्दवाढ प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी संबंधित विभागाची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करावा,’ अशी मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (प्रतिनिधी)
म्हसवड येथील जमिनी लवकर मिळाव्यात...
‘उरमोडी धरण प्रकल्पातील वेणेखोल, ता. सातारा या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे १३९.५५ हेक्टर क्षेत्रावर करण्याचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासमवेत अनेकदा बैठका झाल्या; मात्र पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत नेहमीच उडवाउडवीची उत्तर आणि टाळाटाळ केली जात आहे. उरमोडी धरणाचे काम पूर्ण झाले असून, पाणीसाठ्यास प्रारंभ झाला आहे. धरणाचे पाणी खटाव आणि माण तालुक्यांत पोहोचू लागले आहे. मात्र धरणासाठी स्वत:च्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने वेणेखोल ग्रामस्थांनी धरणस्थळावर आंदोलनही केले आहे. प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबवण्यासाठी त्यांना म्हसवड येथील जमिनी तातडीने मिळण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी,’ अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.