आपत्तींशी सामना करण्यासाठी सुसज्ज राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:29+5:302021-05-24T04:37:29+5:30
वाई : सध्या कोरोनाच्या आपत्तीशी आपण सगळे झुंजत असून, येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या आपत्तींसाठी सर्व विभागांनी सज्ज राहणे गरजेचे ...
वाई : सध्या कोरोनाच्या आपत्तीशी आपण सगळे झुंजत असून, येणाऱ्या पावसाळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या आपत्तींसाठी सर्व विभागांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून, तो चोवीस तास कार्यरत राहणार आहे. कोरोना व इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास ग्रामपातळीवर त्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. या कामी दिरंगाई व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिला.
खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नायब तहसीलदार गीतांजली गरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रांताधिकारी राजापूकर म्हणाल्या, ‘येणाऱ्या काळात आपल्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्याची पूर्वतयारी व आराखडा तयार करणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर, तसेच शहरात पालिकेने माहिती देणारी, तत्काळ मदत करणारी, बचाव करणारी व त्यांचे व्यवस्थापन करणारी अशा विविध टीम तयार कराव्यात. प्रत्येक गावात शाळेमध्ये क्वारंटाइन सेंटर तयार करावे, तसेच त्यांची देखभाल व दुरुस्ती याची काळजी घ्यावी. नदी किनारच्या गावांना धोक्याच्या सूचना कराव्यात, तसेच पूरक्षेत्रातील वसाहतींचे विस्थापनाची तयारी करावी.’
यावेळी गटविकास अधिकारी कुसूरकर, बांधकाम विभागाचे एस.टी. जाधव, श्रीपाद जाधव, डॉ.संदीप यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देसाई, मकरंद गोंजारी, धोम पाटबंधारे उपविभागीय अभियंता नीलेश ठोंबरे, राजेंद्र कदम व निवास मोरे, वनविभागाचे आर.डी. वालकोळी, गटशिक्षणाधिकारी एस. एच. महामुनी, वाई एसटी आगाराचे डी.सी. तरडे, नगरपालिकेचे नारायण गोसावी आदी अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात येत असलेल्या कामांची माहिती सविस्तरपणे मांडली.
यावेळी मंडलाधिकारी राजेंद्र बेलोशे, एम.जे. गायकवाड, आर.आर. झेले, बी.पी. इंगळे, एस.एस. जाधव आदी उपस्थित होते.
चौकट :
मुख्याधिकाऱ्यांंना समज...
अशा महत्त्वाच्या बैठकीस वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांची अनुपस्थिती प्रांताधिकारी यांना खटकल्याने त्यांनी बैठकीत त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांना समज दिली, तसेच आपत्ती व्यवस्थापनाविषयी पालिका काय उपाययोजना करीत आहे, याची सविस्तर माहिती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी उद्याच भेटावे, असेही सांगितले.
फोटो ओळीः वाई येथे आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मार्गदर्शन करताना संगीता राजापुरकर-चौगुले, शेजारी रंजीत भोसले, उदयकुमार कुसूरकर आदी उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)