आता महिनाभर दाढी कटिंग घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:07+5:302021-04-09T04:41:07+5:30
सातारा : कोरोना रोखण्याबाबतीत सरकारला नेमक्या उपाययोजना करताना अनेक अडचणी येत आहेत. केवळ लॉकडाऊन करून महामारी रोखली जाईल, असा ...
सातारा : कोरोना रोखण्याबाबतीत सरकारला नेमक्या उपाययोजना करताना अनेक अडचणी येत आहेत. केवळ लॉकडाऊन करून महामारी रोखली जाईल, असा सरकारचा कयास आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने उपासमारीने मरायची वेळ आली आहे. जिल्ह्यातील नाभिक समाजदेखील आता पुन्हा भीतीच्या छायेत गेलेला आहे.
दुकाने बंद ठेवली असली तरी या लोकांनी आधीच बँकांकडून कर्ज घेतले आहेत. त्यांना माफी दिली गेलेली नाही. बँकेचे अधिकारी-कर्मचारी दुकान उघडताच दारात वसुलीसाठी उभे राहत आहेत तर लाईट बिलाचे पैसे देण्याची पद्धतदेखील उत्पन्न मिळणार अशी परिस्थिती आहे. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये दुकाने सुरू राहिल्याने तसेच ग्राहक वर्गदेखील उत्साहाने येऊ लागल्याने व्यवसाय सुरळीत होता तोच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना महामारीचा कहर होऊ लागल्याने ग्राहक वर्गाने पाठ फिरवली. काही दिवस पोटापुरते पैसे मिळत होते. मात्र आता सरकारनेच सक्तीने दुकान बंद ठेवल्याने या व्यावसायिकांची तसेच त्यावर अवलंबून असलेल्या कारागिरांच्या कुटुंबांची उपासमार होऊ लागली आहे. सरकारने ही दुकाने सुरू ठेवावीत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा हे नाभिक समाज देत आहे.
चौकट
सरकारने ५ हजार रुपये द्यावेत..
सरकारने सक्तीने दुकाने बंद ठेवली आहे तर आता लोकांच्या उदरनिर्वाहासाठी प्रति महिना ५ हजार रुपये बँक खात्यात जमा करावेत. तरच उपासमार थांबेल, असे या कारागिरांचे म्हणणे आहे.
कोट...
नाभिक व्यावसायिक कायम सरकारच्या निर्णयांचे बळी ठरत आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद ठेवली. आता पुन्हा आदेश काढून सक्तीने दुकाने बंद ठेवली आहेत. कर्जाचे हप्ते थकले आहेत. लाईट बिलही कसे भरायचे हा प्रश्न आहे.
- संतोष साळुंखे, ज्येष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा
कोट...
शासनाने घालून दिलेले नियम पाळून आम्ही व्यवसाय करत होतो. कोरोनाची भीती पुन्हा वाढू लागल्याने ग्राहकदेखील पाठ फिरू लागला होता. मात्र पोटापुरते पैसे मिळत होते आता ते देखील बंद झाल्याने कुटुंब कसे चालवायचे हा मोठा प्रश्न आमच्यापुढे आहे.
- सुधाकर देवकर, कारागीर
कोट
सलून व्यवसायामुळे कोरोना महामारी वाढल्याची उदाहरण कुठेही नाही. तरीदेखील ही दुकाने बंद ठेवून शासन काय साधणार आहे, हे नेमके कळायला मार्ग नाही. ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी सरकारने कारवाई करावी, मात्र कुणाच्याही पोटावर मारू नये.
- राजेंद्र साळुंखे, कारागीर
कोट
हजारो लोक कोरोनाबाबत प्रशासनाने दिलेले निर्बंध झुगारून फिरत असले तरी देखील सरकार कारवाई करत नाहीत. उलट जिल्हाबंदी उठल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामध्ये पुणे-मुंबईच्या लोकांची गर्दी झाली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोरोना महामारी पसरली आता देखील तीच परिस्थिती सरकार आणू पाहत आहे का? अशी भीती आहे.
-प्रभाकर खरे, कारागीर