संभाजीनगर येथे कुटुंबास मारहाण; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:46+5:302021-04-29T04:30:46+5:30
सातारा : शहरालगत असणाऱ्या संभाजीनगर येथील अहिरे कॉलनीमध्ये एका कुटुंबास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
सातारा : शहरालगत असणाऱ्या संभाजीनगर येथील अहिरे कॉलनीमध्ये एका कुटुंबास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यश गुजर, रोहित गोटेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमवार, २६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, विमल जगदीप पवार (रा. देगाव रोड, अहिरे कॉलनी, संभाजीनगर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यश प्रभाकर गुजर (रा. अहिरे कॉलनी, सातारा) आणि रोहित गोटेकर (रा. विकासनगर, सातारा) तसेच त्यांच्यासमवेत असणारा एक अनोळखी मुलगा हा विमल यांचा मुलगा निखिल यास हात, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण करत होते. हे भांडण सोडविण्यासाठी विमल आणि त्यांचे पती जगदीप, मुलगा अनिकेत गेले असता त्यांनाही तिघा संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी अनोळखी मुलाने जगदीप यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी विमल पवार यांनी मंगळवार, २७ एप्रिल रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक भोसले हे करीत आहेत.