सरपंचाच्या मुलाकडून ग्रामस्थांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:37 AM2021-04-11T04:37:31+5:302021-04-11T04:37:31+5:30

म्हसवड : ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला, असे म्हणत वळई (ता. माण) गावचे सरपंच बबन काळेल, ग्रामपंचायत सदस्य ...

Beating of villagers by Sarpanch's son | सरपंचाच्या मुलाकडून ग्रामस्थांना मारहाण

सरपंचाच्या मुलाकडून ग्रामस्थांना मारहाण

googlenewsNext

म्हसवड : ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का दिला, असे म्हणत वळई (ता. माण) गावचे सरपंच बबन काळेल, ग्रामपंचायत सदस्य सोपान काळेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुदास काळेल यांना लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, गुरुदास काळेल (रा. वळई, ता. माण) यांनी गावातील गायरानमध्ये असणाऱ्या घरांचे आठ अ चे उतारे मिळावेत म्हणून बुधवार, ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माहिती अधिकाराचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे दिला होता. याबद्दलची माहिती मिळताच त्याचदिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल, सरपंचाचा मुलगा सुनील काळेल व विठ्ठल काळेल यांनी ‘तू माहिती अधिकाराचा अर्ज का दिलास’, असे म्हणत गुरुदास काळेल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बबन काळेल व सुनील काळेल यांनी गुरुदास यांना काठीने तर सोपान काळेल याने दगडाने व विठ्ठल काळेल याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्याने गुरुदास याच्या कानातून रक्त येऊ लागले. यावेळी गुरुदास याचे पाकीट व त्यातील रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाली.

या मारहाणीची माहिती मिळताच गुरुदास याची बहीण पूनम खोत व आई सुनंदा काळेल या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही वरील सर्वांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सुनील याने पूनम यांचा हात पिरगळला. त्याचवेळी सरपंचांचा दुसरा मुलगा नितीन काळेल याने गुरुदास याला आमच्याविरुद्ध तक्रार दिलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी गुरुदास यांनी सातारा येथे शासकीय रुग्णालयात जावून उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी संबंधितांविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून सरपंच बबन काळेल, सदस्य सोपान काळेल, सुनील काळेल, विठ्ठल काळेल व सदाशिव काळेल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार खाडे करत आहेत.

Web Title: Beating of villagers by Sarpanch's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.