घर सजविणारे हात करतायत पुलाचे सुशोभीकरण
By admin | Published: February 9, 2015 09:13 PM2015-02-09T21:13:49+5:302015-02-10T00:26:59+5:30
निसरे पूल : महिलांकडून रंगरंगोटी सुरू
मल्हारपेठ : निसरे पुलाची दुरुस्ती म्हणून आता महिलांच्याकडून रंगरंगोटी केली जात आहे. घर सजवणारे हात आता चुना लावून पुलाचे सुशोभीकरण करत आहेत.निसरे- मारुल हवेली मार्गावर बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाकडे डागडुजीसाठी बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यानंतर या पुलाच्या कठडे व लोखंडी पाईपांचे रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. या रंगाच्या कामासाठी महिला मजूर नेटके काम करत आहे.पुलाच्या दोन्ही कडेला पांढरा चुना लावून ठेकेदार सुरक्षेचे काम अर्धवट करीत आहे. वाहनचलाकांना रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूच्या दिशा समजण्यासाठी रेडियमच्या पट्ट्या व धोकादायक दर्शक फलक बसविणे, मोडतोड झालेले अँगल बसविणे गरजेचे असताना, सिमेंट रस्ता खड्ड्यांनी उद्ध्वस्त झाला असताना चुना लावून सजावट केली जात आहे.२००२ मध्ये तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून बांधलेल्या निसरे पुलामुळे सुमारे ४० गावे, वाड्या जोडल्या. (वार्ताहर)
डागडुजी गरजेची
या पुलामुळे मल्हारपेठ-मारुल हवेली विभाग एक होण्यास मदत झाली. याकरिता या पुलाची वारंवार होणारी दुरवस्था थांबविण्यासाठी बांधकाम खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रंगरंगोटीबरोबर सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक, वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.