‘वाल्मीक’चं सौंदर्य आता एका ‘क्लिक’वर
By admin | Published: March 2, 2015 11:17 PM2015-03-02T23:17:49+5:302015-03-03T00:29:30+5:30
वेबसाईट झाली अपडेट : हौशी युवकांचा पुढाकार, टेबल लँड जगाच्या नकाशावर
सणबूर : अनेक वर्षांपासून वल्मिकी हे निसर्गरम्य ठिकाण निसर्गप्रेमींपासून वंचित होते. हे ठिकाण जगाच्या नकाशावर आणण्याचे काम वेबसाईटद्वारे ढेबेवाडी येथील काही हौशी निसर्गप्रेमींनी केले आहे. निसर्गप्रेमींच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसराची ओळख करून देण्यासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.
सात वर्षांपूर्वी या युवकांनी ही वेबसाईट सुरू करून अनेक प्रेक्षणीय स्थळे निसर्गप्रेमींच्या समोर आणून दिली आहेत. वाल्मीकला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा म्हणून या युवकांनी सतत धडपड केली आणि ठिकठिकाणी माहिती फलक लावले आहेत. ढेबेवाडीपासून अवघ्या २५ ते २७ किलोमीटर अंतरावर वल्मिकी ऋषींची तपोभूमी आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली असल्याचे सांगितले जाते. वाल्मिकी मंदिराच्या पाठीमागून शंभर मीटर अंतरावर वाल्मिकी नदीचा उगम झाला आहे. येथील मंदिराच्या बाजूला एका झऱ्यातून सतत पाणी वाहत असते. या झऱ्यातील पाण्याची क्षमता वाढत गेली आणि या झऱ्याचे रूपांतर वांग नदीत झाले, अशी अख्यायिका आहे. येथे विठ्ठलाईदेवी वाल्मिकी ऋषींचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरी मूर्ती आहेत. शिवाय या मंदिराच्या आतील गाभाराही संगमरवरी आहे. वाल्मिकी ऋषी येथे तपश्चर्या करत असताना त्यांच्या हातातील काठीला पालवी फुटली आणि त्या काठीचे झाडात रूपांतर झाले, अशी अख्यायिका येथे सांगितली जाते.
प्रत्येकाच्या मनाला भुरळ पाडणारे निसर्गसौंदर्य आणि थंड हवामानामुळे प्रतिमहाबळेश्वर म्हणूनच प्रसिद्ध असलेले पाटण तालुक्यातील वाल्मीक हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक आणि निसर्गप्रेमी येत असतात. वांग नदीचे उगमस्थान, उत्साही निसर्गसौंदर्य, थंड हवामान आणि समृद्ध जंगल या कारणांमुळे निसर्गप्रेमी या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. वाल्मीक पठारावरील गर्द झाडीत वाल्मिकी मंदिर असून, या ठिकाणी वांग नदीचा उगम झाला आहे.
वाल्मीकपासून दोन किलोमीटर टेबललँड सुरू होतो. हा परिसर २५ किलोमीटर लांब आणि सात किलोमीटर रुंद आहे. नैऋत्येला संगमेश्वर (नायरी) व दक्षिणेस देखरुख (कुंडी) पर्यंतचा परिसर या टेबललँडने व्यापलेला आहे. (वार्ताहर)
वाल्मीक पठाराचे ई-दर्शन
पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा कंधार धबधबा, इतिहासाचा साक्षीदार प्रचितीगड, सह्याद्रीच्या कुशीतील भैरवगड, निसर्गरम्य क्षेत्र वाल्मीक, मराठवाडी धरणाचे दृष्य, महिंद धरणाचा परिसर, श्रद्धास्थान असलेले नाईकबा मंदिर, सह्याद्रीच्या कुशीतील टेबललँड वेबसाईटवर पाहावयास मिळते.