पवारवाडीचा हिरवागार डोंगर वणव्यामुळे बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:55+5:302021-04-13T04:37:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्राला लागलेल्या वणव्यात दहा हेक्टर क्षेत्राचा धुरळा होऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्राला लागलेल्या वणव्यात दहा हेक्टर क्षेत्राचा धुरळा होऊन गवतासह सुमारे सात हजार झाडे बेचिराख झाली आहेत. झाडांमुळे हिरवागार दिसणारा डोंगर आता वणव्यामुळे काळवंडून गेला आहे.
पवारवाडी येथील घाट परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये दिवसाढवळ्या वणवा लागला. या भीषण वणव्यामुळे आगीसह धुराचे लोट आकाशात उठले. हे दृश्य नजरेस पडताच या घटनेची माहिती पवारवाडी येथील शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली. दरम्यान, कार्यालयीन बैठकीसाठी वनपाल अनिल देशमुख व वनरक्षक नवनाथ कोळेकर कोरेगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोळेकर व अनिल देशमुख तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, घटनास्थळी पोहोचेपर्यंत वणव्याने वनविभागाचे सर्व क्षेत्र घेरले होते. वणव्याने दहा हेक्टर क्षेत्रातील सरपटणारे लहान वन्यप्राणी, कीटक, गवत जळाले होते तसेच करंज, बांबू, लिंब, आपटा आदी विविध प्रकारच्या झाडांची रोपे आगीत होरपळली होती. वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने पूर्णतः नष्ट झाली होती.
चौकट :
वणवा लावणाऱ्यांना अद्दल घडविण्याची गरज...
पवारवाडीतील घाट परिसरात वनविभागाच्या सुमारे दहा हेक्टर क्षेत्रामध्ये अडीच ते पाच वर्षांची सुमारे सात हजार रोपे आहेत. या क्षेत्रात वणवा लागू नये, म्हणून रस्त्याकडेने व ठिकठिकाणी जाळरेषा यापूर्वीच काढण्यात आली होती; परंतु तरीही वणवा लागल्याने कुणीतरी जाणून-बुजून वणवा लावल्याचे स्पष्ट होत आहे. मोठ्या कष्टाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माळरान हिरवागार केला हाेता. दृष्ट प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी वनविभागाने वणवा लावणाऱ्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.
फोटो ओळ : पवारवाडी (ता. कोरेगाव) येथील वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात वणवा लागल्याने रोपांसह गवत जळाले. (छाया : जयदीप जाधव)