चांगले डॉक्टर बनण्यापूर्वी चांगला माणूस बना !
By admin | Published: March 27, 2016 12:09 AM2016-03-27T00:09:25+5:302016-03-27T00:16:12+5:30
नितीन गडकरी : कृष्णा विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत सोहळा; ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
कऱ्हाड : ‘छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदींकडे कोणतीही पदवी नव्हती; मात्र तेच लोक आज शिक्षण क्षेत्रातील अनेक शाखांमध्ये अभ्यासाचे विषय बनले आहेत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आपण आज वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेत आहात. भविष्यात तुम्ही चांगले डॉक्टर जरूर बना; पण त्या अगोदर एक चांगला माणूस म्हणूनही ओळख बनवा. मोफत वैद्यकीय सेवा देऊ नका; मात्र वैद्यकीय सेवाभाव विसरू नका,’ असे भावनिक आवाहन केंद्रीय रस्ते विकास व जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, डॉ. आर. के. अयाचित, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. अतुल भोसले, डॉ. आर. के. गावकर, पी. डी. जॉन, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलू, वैशाली मोहिते, डॉ. एस. सी. काळे, डॉ. सुजाता जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अॅड. भरत पाटील उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, ‘शिक्षण ही माणसाच्या जीवनात अतिशय महत्त्वाची बाब आहे. पदवीदान समारंभ हा एक आनंदाचा क्षण आहे. पण शिक्षणाने माणूस केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही. तर तो सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. एखाद्या अभ्यासाची पदवी हातात मिळाल्यावर आत्मविश्वास वाढायला पाहिजे; पण अनेकदा अहंकार वाढलेला दिसतो. ही बाब चुकीची आहे. ज्ञानाबरोबर संस्कार मिळाले की परिपूर्ण माणूस तयार होतो. त्यामुळे यापुढच्या काळात केवळ विद्वान लोक तयार करून उपयोग नाही. तर त्यांना चांगले नागरिक बनविणे गरजेचे आहे.’
‘आमचा देश धनवान आहे; पण इथले लोक गरीब आहेत. तरीही भारताकडून जगभरातील अनेक देशांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी इथल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. शिक्षणाचा प्रसार अन् रोजगारनिर्मितीबाबत लक्ष दिले पाहिजे. कोणतीही परीक्षा ही जीवनातील अंतिम परीक्षा न समजता रोज नव्या परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. जे लोक परीक्षेला महत्त्वपूर्ण मानतात, तेच लोक इतरांसाठी आदर्श बनतात. शिक्षणाच्या माध्यमातून आज रोज नवीन संशोधन होत आहे. हे संशोधन करणारे गुणवान लोकच भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात,’ असेही त्यांनी सांगितले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एखाद्या विषयातील पदवी हा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतो; पण वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळं आहे. याची जाण अन् भान आज पदवी घेणाऱ्यांनी ठेवले पाहिजे.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे, ही भूमिका बाळगून दिवंगत जयवंतराव भोसले यांनी कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच हे विद्यापीठ साकारले असून, आता हे विद्यापीठ देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनत आहे. (प्रतिनिधी)
इव्हॉन याँग पै सेज तीन पदकांची मानकरी
एमबीबीएस अधिविभागातील इव्हॉन याँग पै सेज या विद्यार्थिनीने दिवंगत गोविंंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीसाठी दिले जाणारे डॉ. एम. एस. कंटक अॅवॉर्ड आणि डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार पटकावून सर्वाधिक तीन पदकांची मानकरी ठरली. विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणाऱ्या दिवंगत जयवंतराव भोसले सुवर्ण पदकाची मानकरी मिखिला किशोर खेडकर ठरली. तसेच कोमल धनंजय कुलकर्णी हिने यूएसव्ही सुवर्णपदक व डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार, तसेच स्रेहल महादेव सोमावर, मृण्मयी गिरीश लिमये, प्रणव गजानन देवधर, डॉ. मेहुल पोपटलाल ओसवाल, डॉ. तस्नीम विक्रमसिंंग बिष्ट व डॉ. राजश्री बाळासाहेब भोसले यांनीही विविध पारिताषिके पटकाविली.