बेड उपलब्ध.. मात्र रुग्णालयांकडून बिले भरमसाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:16+5:302021-05-27T04:41:16+5:30

फलटण : फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असली तरी गावोगावी होत असलेल्या विलगीकरण कक्षामुळे गंभीर रुग्णांना ...

Beds available .. but the bills from the hospitals are huge! | बेड उपलब्ध.. मात्र रुग्णालयांकडून बिले भरमसाठ!

बेड उपलब्ध.. मात्र रुग्णालयांकडून बिले भरमसाठ!

Next

फलटण : फलटण तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असली तरी गावोगावी होत असलेल्या विलगीकरण कक्षामुळे गंभीर रुग्णांना फलटण शहरात सहज बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे पुरेशी वैद्यकीय सेवा मिळू लागली आहे; मात्र अद्यापही काही रुग्णालयाकडून भरमसाठ बिलांची आकारणी सुरूच असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

फलटण शहरात शासकीय व खासगी रुग्णालये, कोरोना हेल्थ केअर सेंटर्सच्या माध्यमातून व्हेंटिलेटर्स, आयसीयू, ऑक्सिजन सुविधा असलेले आणि जनरल असे एकूण ७५७ बेड उपलब्ध आहेत. आजच्या स्थितीला त्यापैकी केवळ ४१९ बेडवर रुग्ण दाखल असून, ३३८ विविध प्रकारचे बेड शिल्लक आहेत आहेत. याशिवाय ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ही शेकडो बेडस्‌ उपलब्ध असल्याने बाधित रुग्णांना बेडसाठी आता धावाधाव करायची गरज लागलेली नाही. पूर्वी संस्थात्मक विलगीकरण कक्ष नसताना फलटण शहरातील हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांना बेडसाठी धावाधाव करावी लागायची. शहरात बेड नाही मिळाला तर शेजारील बारामती आणि सातारा येथे बेडसाठी जावे लागायचे. शहरातील काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भरमसाठ बिलामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत होता. काहींनी रुग्णांच्या हतबलतेेचा फायदा उचलून महागड्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन विकली. यातील एक टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी आणखी बरेचजण बाजूलाच राहिले गेले आहे. या इंजेक्शनच्या काळ्याबाजाराचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.

गोरगरीब कोरोना रुग्णांना कमी पैशात चांगले उपचार मिळावे म्हणून फलटण पालिकेने शिंगणापूर रोड येथील जुन्या लेडीज होस्टेलची इमारत एका खासगी रुग्णालयाला २५ टक्के डिस्काउंट द्यायला लावून चालवायला दिली आहे; मात्र येथेही बिलासंदर्भात आणि सोयी सुविधासंदर्भात तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत प्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे दाद मागूनही रुग्णांना फायदा झालेला नाही.

चौकट..

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज...

तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि बेडची कमतरता पाहून गावोगावी संस्थात्मक विलगीकरण करण्यास तालुक्यातील नेतेमंडळींनी प्रोत्साहन दिल्याने गोरगरीब रुग्णांना चांगला आधार मिळाला आहे, तसेच शहरातील अनेक हॉस्पिटलमधील बेड यामुळे रिकामे राहून गंभीर रुग्णांना हेेेे बेड मिळू लागल्याने त्यांच्यावर चांगले उपचार होत आहेत. शहरातील काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना शासनाच्या दराप्रमाणे बिले मिळत आहेत तर काही ठिकाणी भरमसाठ बिले आकारली जात असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Beds available .. but the bills from the hospitals are huge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.