पाटणजवळ रानडुकराचे मांस जप्त : तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:13+5:302021-09-25T04:43:13+5:30
सातारा : रानडुकराची शिकार करून डावरी (ता. पाटण) येथे मांस विकणाऱ्या तिघांवर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून शिकारीचे ...
सातारा : रानडुकराची शिकार करून डावरी (ता. पाटण) येथे मांस विकणाऱ्या तिघांवर वनाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दशरथ विष्णू मोहिते, विलास शामराव सत्रे व सोमनाथ संपत तिकुडवे (सर्व रा. डावरी, ता. पाटण) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित व्यक्ती डुकराचे मांस विकत असल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार यांना मिळाली. त्यानुसार डावरी गावच्या हद्दीत ''टॅक'' या स्थानिक नावाने प्रसिद्ध असलेल्या वस्तादाच्या विहिरीजवळ छापा टाकण्यात आला. एका झाडाखाली संशयित लोक डुकराचे मांस विक्री करताना आढळले.
त्यांना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. संशयितांजवळ मांस तोडण्याचे तीन सत्तूर, पक्षी पकडण्याची जाळी हे साहित्य मिळाले. संशयितांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा नोंद करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल एल. व्ही. पोतदार, वनपाल एस. बी. भाट, ए. डी. राऊत, वनरक्षक व्ही. एम. चौरे, बी. ए. माने, डी. बी. बर्गे, वनमजूर आर. व्ही. कदम यांच्या पथकाने केली.