Satara: विकास नव्हे, बीअर बार वाढले : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:06 PM2024-10-15T12:06:55+5:302024-10-15T12:08:04+5:30
'वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढलं'
पाटण (जि. सातारा) : ‘पाटण तालुक्यासह महाराष्ट्राने विक्रमसिंह पाटणकर यांचा मंत्रिपदाचा काळ अनुभवला, मात्र सध्याचे मंत्री हे दहशत माजवत गैरप्रकाराला पाठबळ देत आहेत. पाटणला या मंत्रिमहोदयांच्या काळात विकास नव्हे, तर बीअर बार वाढले आहेत. वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढलं आहे,’ असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. पाटण येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, ‘आरोग्य, रस्ते, शेती पूर्णपणे कोलमडली आहे. राज्यात महिलांवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार, महागाई वाढत आहे. वाय प्लस सुरक्षा असतानाही जर यांचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर स्थानिक जनता कशी सुरक्षित राहणार याचाही विचार करायला पाहिजे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ‘महायुतीचे सरकार अगदी चित्रपटांना लाजवेल असा कारभार करत आहे. जाऊ तिथे खाऊ, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि काय द्याचं बोला अशीच या मंडळींची अवस्था आहे. मुख्यमंत्री दसरा मेळाव्यात आपण पळून जाणाऱ्यातला नाही असे म्हणाले. पण दुर्दैवाने ते पळवून नेणाऱ्यातले आहेत, हे बोलायला विसरले. त्यांनी राज्यातील सेनेचे आमदारच नव्हे, तर तुमचा विकास, तुमचे प्रकल्प, तुमचा रोजगार, तुमचा स्वाभिमान पळवून नेत तो दिल्लीपतींच्या पायावर नेऊन ठेवल, यापेक्षा दुर्दैव नाही.’