माहेरापासून मधमाशा दुरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:14+5:302021-05-20T04:43:14+5:30

(मधमाशी दिन विशेष) प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात ...

The bees distanced themselves from Mahera | माहेरापासून मधमाशा दुरावल्या

माहेरापासून मधमाशा दुरावल्या

Next

(मधमाशी दिन विशेष)

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मधमाश्यांचे माहेरघर समजल्या गेलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढत्या शहरी नागरीकरणाबरोबरच स्ट्रॉबेरी, बटाटा आणि गाजर या अपारंपरिक पिकांमुळे वनांखालील क्षेत्रात घट झाली. परिणामी मधमाश्यांचे नैसर्गिक मधाचे आगर नष्ट झाले. त्यामुळे सुमारे २५ हजार मधपेट्या धारण क्षमता असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज अवघ्या हजारभर मधपेट्या कार्यान्वित आहेत.

भारतात मधाचे सर्वाधिक उत्पन्न मधुमक्षिका पालनाद्वारे पंजाब राज्यात होते. नैसर्गिक मधाचे संकलन भारताच्या उत्तरपूर्व आणि महाराष्ट्र राज्यात होते. मागील काही दशकांपासून राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात पर्यटन, खाणकाम, स्ट्रॉबेरी, मलबेरीसारखी अपारंपरिक पिके यांसह व्यापारी लाकूड उत्पादनासाठी एकजातीय वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक भारतीय मधमाशी प्रजातींना त्याचा मोठा फटका बसला आहे. स्थानिक वृक्षराजीचे वनांखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे नैसर्गिक मधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसऱ्या बाजूस मधुमक्षिका पालनाद्वारे यामध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित होता. मात्र, बदलत्या पीकपद्धतीसह अधिक उत्पादनासाठी या पिकांवर मारल्या जाणाऱ्या कीटकनाशके व इतर फवारण्यांमुळे मधसंकलनाऐवजी मधमाशांचा मृत्यू होऊ लागला आहे. निसर्गत: अस्तित्वात असलेल्या मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या कमी झाली आहे.

अन्न पिकांपासून ते नैसर्गिक बहुतांश वनस्पतींचे परागीभवनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम मधमाश्या करतात. भविष्यात मधमाश्याच्या घटत्या संख्येमुळे अन्नदुर्भिक्ष्य संकटाला मानवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे जतन करणे आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावरही विशेष मोहीम राबविली जाणे या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

चौकट

‘थाईसॅकब्रुड’चीही लाट ठरतेय जीवघेणी

मधमाश्यांमध्येही विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यात प्रामुख्याने ‘थाईसॅकब्रुड’ हा रोग मधमाश्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. यामुळे मधुमक्षिकापालकांकडील तसेच निसर्गातीलही मधमाश्यांच्या अनेक वसाहती नष्ट होतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर एकाच वेळी हजारो मधमाश्या मृत्युमुखी पडतात. याच्या अटकावासाठी विविध स्तरांवर अभ्यास सुरू आहे, मात्र अद्यापही ठोस उपाय न मिळाल्याने ही मधमाश्यांची संख्या घटत आहे.

कोट :

जैवसाखळीत मधमाशी परागीभवनाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे आपल्याला अन्न उत्पादन मिळते. परागीभवनाची कोणतीही कृत्रिम पद्धती मानवाला ज्ञात नाही आणि ते करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मधमाश्यांच्या अधिवासाचे संवर्धन, संरक्षण मनुष्याच्या हिताचे आहे.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा

Web Title: The bees distanced themselves from Mahera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.