स्वत:च्या उमेदवारावर तरी विश्वास ठेवा

By admin | Published: November 17, 2016 11:01 PM2016-11-17T23:01:06+5:302016-11-17T23:01:06+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा टोला : शब्द अन् तत्त्व यांचा ताळमेळ नसणाऱ्या नेत्याच्या आघाडीबद्दल जनतेने गांभीर्याने विचार करावा

Believe your own candidate | स्वत:च्या उमेदवारावर तरी विश्वास ठेवा

स्वत:च्या उमेदवारावर तरी विश्वास ठेवा

Next

सातारा : ‘आम्ही तत्त्वाशी कधीही तडजोड करत नाही आणि दिलेला शब्द कधीही बदलत नाही. सातारा शहरासाठी चांगले काम करणे आवश्यक आहे. करंजे प्रभागात अधिकृत उमेदवाराला माघार घेण्यास सांगून त्यांनी अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले. काही आर्थिक व इतर विषयांमुळे हा प्रकार घडला. याप्रकारात तत्व, शब्द याचा काही मेळ आहे का? दिलेला उमेदवार निवडून येईल का नाही याची गॅरंटी त्यांना नाही. त्यांचा त्यांच्याच उमेदवारावर विश्वास नाही. अशा आघाडीचा आपण विचार करायचा का, हे जनतेने ठरवले पाहिजे. त्यामुळे निर्णयक्षम, कार्यक्षम नगराध्यक्ष का, बाहुला, कटपुतली नगराध्यक्ष द्यायचा हे जनताच ठरवेल,’ अशा शब्दात ‘नविआ’चे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
करंजे येथे प्रभाग क्र. ९ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी ‘नविआ’च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले, प्रभाग क्र. ९ चे उमेदवार बाळासाहेब भुजबळ, शैलजा कीर्दत, वैशाली महामुने, डॅनी पवार यांच्यासह विद्यमान नगरसेवक भाग्यवंत कुंभार, माधुरी भोसले, अतुल चव्हाण, जयश्री गिरी, संपत कीर्दत, हेमंत कासार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘नविआ’ने सर्व उमेदवार कार्यक्षम दिले आहेत. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीनुसार राजकारण करताना आम्ही दिलेला शब्द कधीही बदलत नाही. तत्त्वाशी बांधिल राहून फायदा-तोटा याचा विचार करत नाही. शब्द पाळायचा आणि तो पूर्णत्वास न्यायचा. जनतेप्रतीची ही जबाबदारी पार पाडण्यासाठी नगरविकास आघाडी कटिबद्ध आहे. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. पालिकेला स्वत:चा निर्णय स्वत: घेणारा नगराध्यक्ष मिळणे काळाची गरज आहे. प्रश्न सोडवणारा नगरसेवक हवा तर, नगराध्यक्ष सुद्धा सक्षम आणि तातडीने निर्णय घेणारा असला पाहिजे. तरीही गाफिल राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे.
यावेळी बाळासाहेब भुजबळ, माधुरी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस वसंतराव कीर्दत, प्रकाश फडतरे, अशोक भोसले, बाळासाहेब मोरे, योगेश सूर्यवंशी, गणेश भोसले, शंकर कीर्दत, हणमंत फडतरे, शशिकांत विभुते, चंद्रकांत जाधव, नाना चोरगे, संजय कासार, दीपक शिंदे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माजी नगरसेवक जगन्नाथ कीर्दत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गंगाधर फडतरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (प्रतिनिधी)
विरोधकांनी घराणेशाहीचा आसरा घेतला...
‘कार्यक्षम व्यक्तीवर आरोप करायचे आणि आपण कर्तव्यशून्य असल्याचे लपवायचे. आपण आतापर्यंत जे काम केले असेल ते काम जनतेपुढे मांडून उमेदवारांनी मते मागायला हवीत. मात्र, विरोधकांना घराणेशाहीचा आसरा घेण्यापलीकडे काहीही जमले नाही,’ अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांच्या चुकीच्या प्रचारावर झोड उठवली. करंजे येथील कोपरा सभेत बोलताना वेदांतिकाराजे भोसले यांनीही भविष्यातील साताऱ्याच्या विकासाबद्दल सुतोवाच केले. ‘नागरिक प्रथम’ ही आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
साताऱ्यातील संघर्षामुळे एक मोठी दरी...
माझी पत्नी म्हणून नाही तर, एक कार्यक्षम, सुशिक्षित आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळेच वेदांतिकाराजे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. १० वर्षांपूर्वी जेष्ठांच्या मध्यस्थीने आम्ही एकत्र आलो. मात्र, आता असे काय कारण घडले ते मला समजलेले नाही. पुन्हा संघर्षाचे वातावरण तयार झाले असून कार्यकर्ते, नागरिक मोकळेपणाणे वावरत नाहीत. संघर्षामुळे एक दरी निर्माण होत असून याची मला नेहमीच खंत वाटत राहील. मनोमिलन तुटल्यामुळे नको तो संघर्ष सुरू झाल्याची मला खंत आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे तेली खड्डा येथे प्रभाग ७, ८ व ११ मधील नागरिकांच्या बैठकीत म्हणाले.
 

Web Title: Believe your own candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.