वॉटर कप स्पर्धेसाठी बेलेवाडीकर एकवटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 07:15 PM2018-02-04T19:15:24+5:302018-02-04T19:15:44+5:30
युवकांचा लक्षणीय सहभाग : दोन वनराई बंधारे बांधून प्रारंभ
रहिमतपूर : वॉटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचाच, असा निश्चय करून कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधून जलसंधारणाच्या कामाला प्रारंभ केला आहे.
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी बेलेवाडीकर एकवटले आहेत. लोकसहभागातून सुमारे २० फूट अंतराचे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. सरपंच संतोष जाधव, उपसरपंच हरिष कणसे, मंडल कृषी अधिकारी जाधव, कृषी सहायक वैशाली सुतार, ग्रामसेवक संतोष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, बंधारे बांधण्याबाबतचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी साळुंखे यांनी केले.
नियोजनबद्धपणे जलसंधारणाची कामे करणार...
जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी नियोजनबद्धपणे जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली कामे लोकसहभागातून ताकदीने केली जातील, असा विश्वास सरपंच संतोष जाधव यांनी व्यक्त केला आहे.